RBI cheque Policy : चेकद्वारे व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ जानेवारी २०२६ पासून चेक क्लिअरन्सची प्रक्रिया सुपरफास्ट होऊन अवघ्या तीन तासांत पैसे खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने या महत्त्वाकांक्षी बदलाचा दुसरा टप्पा तूर्तास स्थगित केला आहे. ३ जानेवारी २०२६ पासून लागू होणारा हा नियम आता पुढील सूचना मिळेपर्यंत अंमलात येणार नाही.
नेमका निर्णय काय?
रिझर्व्ह बँकेने २४ डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले की, 'चेक ट्रंकेशन सिस्टम' अंतर्गत वेगवान चेक क्लिअरन्सच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी स्थगित करण्यात आली आहे. या नियमानुसार, बँकांना चेकची डिजिटल इमेज मिळाल्यापासून ३ तासांच्या आत तो मंजूर किंवा नामंजूर करणे बंधनकारक होते. जर बँकेने या वेळेत प्रतिसाद दिला नाही, तर तो चेक 'ऑटो-क्लिअर' म्हणजेच मंजूर मानला जाणार होता. तांत्रिक सज्जता आणि बँकिंग प्रणालीची स्थिरता विचारात घेऊन आरबीआयने ही डेडलाईन पुढे ढकलली आहे.
सध्याची स्थिती : 'फेज-१' नुसार व्यवहार सुरू राहणार
- दुसरा टप्पा स्थगित झाला असला तरी, पहिल्या टप्प्यातील 'कंट्युनिंग क्लिअरिंग आणि सेटलमेंट' प्रणाली पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू असलेल्या या प्रणालीत खालील बाबींचा समावेश आहे.
- डिजिटल प्रोसेसिंग : चेक प्रत्यक्ष एका बँकेतून दुसऱ्या बँकेत न पाठवता त्याच्या स्कॅन कॉपी आणि 'MICR' डेटाद्वारे क्लिअरिंग केले जाते.
- नवा वेळ : आरबीआयने चेक प्रोसेसिंगच्या वेळेत बदल केला आहे. आता 'प्रेझेंटेशन विंडो' सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत असेल, तर चेक मंजूर किंवा नामंजूर करण्याची वेळ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
- दिवसाच्या अखेरीस निकाल : बँकांना मिळालेले चेक त्याच दिवशी सायंकाळपर्यंत निकाली काढणे अनिवार्य आहे, अन्यथा ते मंजूर मानले जातात.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
फेज-२ टळल्यामुळे ग्राहकांना 'सुपरफास्ट' म्हणजे अवघ्या काही तासांत पैसे मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. पण, फेज-१ मुळे चेक क्लिअर होण्यासाठी लागणारा २-३ दिवसांचा जुना काळ आता इतिहास जमा झाला असून, व्यवहार एका दिवसात पूर्ण होत आहेत. दुसऱ्या टप्प्याची नवीन तारीख आरबीआय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.
