RBI Offline Digital Rupee:मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑफलाइन डिजिटल रुपया (e₹) लॉन्च केला आहे. या नव्या सुविधेमुळे आता इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवायही डिजिटल पेमेंट करणे शक्य होणार आहे. आरबीआयचा हा नवा उपक्रम भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.
काय आहे e₹ ?
डिजिटल रुपया (e₹) ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच, भारतीय रुपयाचाच डिजिटल अवतार आहे. याचा उपयोग अगदी आपल्या खिशातल्या रोकड पैशासारखाच करता येतो; फरक एवढाच की तो डिजिटल स्वरूपात असतो. तुम्ही तो आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवून ऑफलाइन वापरू शकता. प्रत्येक व्यवहारासाठी बँक खाते उघडण्याची गरज नाही. युजर्स हे वॉलेट अॅप्स गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात.
पेमेंट कसे करायचे?
ऑफलाइन डिजिटल रुपया वापरताना क्यूआर कोड स्कॅन करून किंवा फक्त टॅप करून व्यवहार करता येईल. इंटरनेट कनेक्शन नसतानाही व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होईल. यामुळे हे चलन कॅशसारखेच वापरणे शक्य आहे.
ग्रामीण भारतासाठी दिलासा
या नव्या सुविधेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण आणि दुर्गम भागांतील लोकांना होणार आहे, जिथे इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क मर्यादित असते. e₹ चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे “ऑफलाइन पे” फीचर. यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या सहकार्याने NFC-आधारित पेमेंट तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यामुळे नेटवर्कशिवायही व्यवहार करता येतील आणि गावागावातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील.
कोणत्या बँकांमध्ये मिळेल ही सुविधा?
डिजिटल रुपया आता देशातील अनेक बँकांमध्ये डिजिटल वॉलेट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यात खालील बँक्स समाविष्ट आहेत...
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
ICICI बँक
IDFC फर्स्ट बँक
HDFC बँक
Yes बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
कोटक महिंद्रा बँक
कॅनरा बँक
अॅक्सिस बँक
इंडसइंड बँक
पंजाब नॅशनल बँक
फेडरल बँक
इंडियन बँक