RBI net Sold :डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अनेक जागतिक समीकरणे बदलली आहे. ट्रम्प यांच्या येण्याने डॉलर मजबूत झाला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी पातळीवर घसरण झाली आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. रुपया स्थिर ठेवण्यासाठी सेंट्रल बँकेने २०२४ मध्ये परकीय चलन बाजारात १५.२ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १३,१९,५९,५६,००,००० रुपये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकले. आरबीआय दर महिन्याला ही आकडेवारी जाहीर करते. यावेळी बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
त्याआधी नोव्हेंबरमध्ये आरबीआयने २०.२ अब्ज डॉलरची विक्री केली होती. म्हणजेच डिसेंबरमध्ये विक्री ५ अब्ज डॉलरने कमी झाली. नोव्हेंबरमध्ये अमेरिकन डॉलरच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली होती. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्यापार युद्धाची भीती वाढल्यामुळे हे घडले. अशाप्रकारे, २ महिन्यांत, आरबीआयने रुपयाची घसरण रोखण्यासाठी ३५.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३०,७३,४१,०३,००,००० रुपये खर्च केले आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये, आरबीआयने स्पॉट मार्केटमध्ये ६९ अब्ज डॉलर्सची विक्री केली. त्यासोबत ५३.९ अब्ज डॉलर्स विकत घेतले. आरबीआयच्या बुलेटिननुसार डिसेंबरच्या अखेरीस आरबीआयची थकबाकी फॉरवर्ड विक्री ६७.९ अब्ज डॉलर्स होती. गेल्या महिन्यात ते ५८.९ अब्ज डॉलर होती. फॉरवर्ड विक्री म्हणजे भविष्यातील तारखेला डॉलर्स विकण्याचा करार. बाजारात जास्त चढ-उतार टाळण्यासाठी आरबीआय डॉलरची खरेदी आणि विक्री करते. अलिकडच्या काही महिन्यांत, आरबीआय डॉलरच्या विक्रीसाठी सक्रिय आहे. त्यामुळे बाजारात रुपयाचे प्रमाण कमी होते.
रुपया घसरल्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार?
रुपयाचे मूल्य घसरल्याने आयात महाग झाली आहे. त्यामुळे कच्चे तेल, खाद्यतेलासारख्या वस्तूंच्या किमती वाढतात. आरबीआय गव्हर्नरने अलीकडेच म्हटले होते की रुपयाचे ५% अवमूल्यन झाले तरी ०.३०-०.३५% ने महागाई वाढते. आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे ४० चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. जानेवारीमध्ये व्यापार भारित वास्तविक प्रभावी विनिमय दर १०७.१३ वरून १०४.८२ पर्यंत घसरला. हा दर रुपयाची खरी ताकद सांगतो. कमकुवत चलन निर्यातीसाठी चांगले मानले जाते. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलीकडेच सांगितले की, आरबीआय आपल्या चलन व्यवस्थापन धोरणावर ठाम आहे.
डेटा अद्याप जाहीर झाला नसला तरी, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) विक्रमी विक्री केल्यानंतर आरबीआयने देखील जानेवारीमध्ये डॉलरची विक्री सुरू ठेवली. FII ने जानेवारी २०२५ मध्ये ८७,३७५ कोटी रुपयांची विक्री केली. अलिकडच्या वर्षांत ही सर्वाधिक मासिक विक्री आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत, परकीय चलन साठ्यात अंदाजे ६३ अब्ज डॉलरची घट होऊन ६३८ अब्ज डॉलर झाला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये तो ७०१ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.