rbi repo rate : नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा! कारण, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच रेपो दरात मोठी कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज स्वस्त होण्याची आणि तुमच्या मासिक हप्त्याची (EMI) रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) तीन चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठका पुढील महिन्यातील जूनपासून दिवाळीपर्यंत होणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत होणार निर्णय?
रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती (MPC) पुढील महिन्यात जूनपासून ते दिवाळीपर्यंत तीन बैठका घेणार आहे. अनेक अहवालांनुसार, या तिन्ही बैठकांमध्ये रेपो दरात ०.५० ते ०.७५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. जर असे झाले, तर सामान्य माणसाला कर्जाच्या ओझ्यातून मोठा दिलासा मिळू शकतो.
पहिला दिलासा जूनमध्ये मिळण्याची शक्यता
वृत्तानुसार, आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची पहिली बैठक ४ ते ६ जून दरम्यान होणार आहे. या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि रेपो दरात सुमारे ०.२५% ची कपात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकांमध्ये आणखी ०.२५% ते ०.५०% पर्यंत कपात अपेक्षित आहे.
दिवाळीपर्यंत व्याजदर ०.७५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता
अनेक तज्ज्ञांच्या मते, दिवाळीपूर्वी मध्यमवर्गीयांसाठी मोठी खुशखबर येऊ शकते. आरबीआय रेपो रेटमध्ये एकूण ०.७५ टक्क्यांपर्यंत घट करू शकते. सध्या रेपो दर ६% आहे, जो दिवाळीपर्यंत ५.२५% पर्यंत खाली येऊ शकतो. नोमुरा या संस्थेचा अंदाज आहे की २०२५ च्या अखेरीस रेपो दरात आणखी १% (१०० बेसिस पॉइंट्स) ची कपात होऊ शकते आणि तो ५% पर्यंत खाली येऊ शकतो.
गृहकर्ज आणि वाहन कर्ज होणार स्वस्त
रेपो रेट म्हणजे तो व्याजदर ज्यावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते. बँका याच दरावर थोडं जास्त व्याज लावून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे, जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना स्वस्त कर्ज मिळेल आणि त्या ग्राहकांनाही कमी व्याजदरात गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्ज (Car Loan) देऊ शकतील. यामुळे तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी होईल. तसेच, उद्योगांना स्वस्त कर्ज मिळाल्याने शहरांमधील मागणी वाढेल आणि कारखान्यांमध्ये गुंतवणूक वाढून रोजगार निर्माण होईल.
फेब्रुवारीपासून ०.५०% नी स्वस्त झाले कर्ज
आरबीआयने यावर्षी फेब्रुवारीपासून रेपो दरात कपात करण्यास सुरुवात केली होती आणि आतापर्यंत दोन बैठकांमध्ये ०.५०% नी तो कमी केला आहे, ज्यामुळे रेपो दर ६% पर्यंत आला आहे. चलनविषयक धोरण समितीमध्ये ६ सदस्य असतात, ज्यापैकी ३ आरबीआयचे आणि ३ केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले असतात. आरबीआयची बैठक दर दोन महिन्यांनी होते आणि २०२५-२६ या वर्षासाठी एकूण ६ बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
वाचा - शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
व्याजदर का कमी होऊ शकतो?
एसबीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष सनी अग्रवाल यांच्या मते, अनेक सकारात्मक गोष्टी व्याजदर कपातीचे संकेत देत आहेत. यावर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे, देशाचा जीडीपी (GDP) वाढ स्थिर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागाई नियंत्रणात आहे. आरबीआय गव्हर्नर यांनीही मागील बैठकीत महागाई नियंत्रणात राहिल्यास व्याजदर आणखी कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे, घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.