Cyber Fraud Protection : अलीकडच्या काही वर्षात सायबर गुन्हेगारांनी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. इंटरनेटचा स्पीड वाढला तशा या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. काहीशे रुपयांपासून कोट्यावधींची बँक खाती काही मिनिटांत साफ केली जात आहेत. विविध उपाययोजना करुनही हे गुन्हे थांबायचं नाव घेताना दिसत नाही. आता कॉलरट्युनही अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन केलं जात आहे. मात्र, हा धोका आता कायमचा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सर्वसामान्यांची बँक खाती सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ठोस पाऊल उचलले आहे. शुक्रवारी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सायबर फसवणुकीवर चिंता व्यक्त केली. बँकांमधील फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने अनेक पावले उचलण्याचे सांगितले आहे.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आरबीआयचा पुढाकार
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना सायबर जोखमीशी संबंधित प्रणाली मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. गव्हर्नर म्हणाले की, सायबर गुन्हेगारीला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही एका व्यक्तीचे प्रयत्न चालणार नाहीत, तर सर्व संबंधितांना या दिशेने एकत्रितपणे काम करावे लागेल. गव्हर्नर म्हणाले की, सेंट्रल बँक देखील आपल्या स्तरावर काही बदल करणार आहे, ज्याची अंमलबजावणी एप्रिलपासून केली जाईल.
देशाबाहेरील ट्रांजक्शनवर राहणार लक्ष
बहुतेक सायबर गुन्हेगार देशाबाहेरुन हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे देशाबाहेरील पेमेंटवर लक्ष ठेवण्यावरही आरबीआयने भर दिला. देशाच्या सीमेबाहेर केलेल्या कोणत्याही पेमेंटला सायबर फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी त्यांनी द्वि-स्तरीय ऑथेंटिकेशनचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय गुंतवणूकदारांसाठी सरकारी रोख्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. हे गुंतवणूकदारांच्या जोखमीचे योग्य व्यवस्थापन करू शकते.
बँकांसाठी नवीन डोमेन येणार
सायबर फसवणूक थांबवण्यासाठी बँकांचे डोमेन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गव्हर्नर म्हणाले, की बँकांच्या वेबसाईटचे डोमेन बदलून त्यात fin.in जोडण्यात येणार आहे. यामुळे गुन्हेगारांना ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करणे कठीण होईल. नवीन डोमेनची नोंदणी या वर्षी एप्रिलपासून सुरू होणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात लढावी, अशी माझी इच्छा असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले.
बँकाचे इंटरनेट बदलणार?
बँकिंग विषयातील तज्ज्ञ आणि व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्विनी राणा म्हणाले की सायबर फसवणूक रोखण्यासाठी आरबीआय एक नवीन इंटरनेट कंपनी स्थापन करण्याचा विचार करू शकते. ते म्हणाले की, सध्या बहुतांश सरकारी बँका बीएसएनएलच्या नेटवर्कवर चालतात, तर काही सुविधा एअरटेलच्या इंटरनेटवर उपलब्ध करून दिल्या जातात. सरकार बीएसएनएलला नवीन कंपनी किंवा सर्व्हर बनवून बँकांना इंटरनेट पुरवण्यास सांगू शकते.