Punjab National Bank revises interest rates: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) गृह आणि कार लोनसह किरकोळ कर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. पीएनबीनं जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सुधारित दर गृहकर्ज, कार लोन, शिक्षण आणि वैयक्तिक कर्जासह विविध उत्पादनांवर लागू होतील, जेणेकरून ग्राहकांना फायनान्सचे अनेक पर्याय उपलब्ध राहतील. हे नवीन दर १० फेब्रुवारीपासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली.
आरबीआयनं रेपो दरात केलेली कपात
व्याजदरात कपात केल्यानंतर पीएनबीनं विविध योजनांअंतर्गत गृहकर्जाचे दर ८.१५ टक्क्यांवर आणले आहेत. ग्राहकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटरी फी पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. गृहकर्ज योजनेतील व्याजदर वार्षिक ८.१५ टक्क्यांपासून सुरू होतो आणि मासिक हप्ता ७४४ रुपये प्रति लाख करण्यात आलाय.
कार लोनसंदर्भात बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि वापरलेल्या दोन्ही कार फायनान्ससाठी व्याजदर वार्षिक ८.५० टक्क्यांपासून सुरू होतात आणि मासिक हप्ता १,२४० रुपये प्रति लाख इतका कमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करून तो ६.२५ टक्क्यांवर आणलाय.
ग्राहकांना १२० महिन्यांपर्यंतच्या परतफेडीचा लाभ घेता येईल आणि एक्स-शोरूम किमतीच्या १०० टक्के फायनान्सिंगचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत किमान कार्डचा दर ७.८५ टक्के करण्यात आलाय. ग्राहकांना विनाअडथळा डिजिटल प्रक्रियेद्वारे २० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळू शकतं, ज्यामुळे शाखेत जाण्याची किंवा कागदपत्रांची आवश्यकता नाही. सुधारित दर ११.२५ टक्क्यांपासून सुरू होतो. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक व्याजदरात कपातीच्या अनुषंगानं स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) गृहकर्जासह किरकोळ कर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात केलीये.