Piyush Goyal News : महागाई कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दर कमी करेल, अशी आशा सर्वांना होती. मात्र, आरबीआयने सलग ११व्यांदा रेपो दर कायम ठेवले आहेत. यावरुन आता सरकार आणि आरबीआय आमनेसामने आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अन्नधान्य महागाई आणि उच्च व्याजदरांना तोंड देण्यासाठी धोरणात बदल करण्याची मागणी केली आहे. शनिवारी मुंबईत इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स (IBLA) ला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की त्यांना RBI च्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसला तरी ते फक्त मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मतांचा पुनरुच्चार करत आहेत. टोमॅटो आणि डाळींसारख्या वस्तूंच्या मागणीवर व्याजदराचा कसा परिणाम होतो, यावरही पीयूष गोयल यांनी आपलं मत मांडलं.
गोयल यांनी भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. तात्पुरत्या निवडणुकीच्या कारणांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मंदावली असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या स्थूल आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या ताकदीवरही त्यांनी भर दिला. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निर्णय जाहीर करताना आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवले आहेत.
पुढे बोलताना गोयल म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था शेअर बाजाराप्रमाणे एका तिमाहीपासून दुसऱ्या तिमाहीत जात नाही. "सर्व विस्तृत डेटातून स्पष्ट होतं की अर्थव्यवस्थेची मूलभूत ताकद अबाधित आहे." अर्थव्यवस्था शेअर बाजारासारख्या अल्प-मुदतीच्या तिमाही ट्रेंडसारखी चालत नाही. मॅक्रो इकॉनॉमिक डेटानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेची मूलभूत ताकद स्थिर आहे. गोयल म्हणाले की, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील.
पीयूष गोयल यांनी आर्थिक तिसऱ्या तिमाहीत भांडवली खर्चात (कॅपेक्स) सुधारणा होण्याचे संकेत असल्याचे स्पष्ट केलं. ते म्हणाले, “तिसऱ्या तिमाहीत उच्च भांडवली खर्चाचे संकेत दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मोठ्या प्रकल्पांचे निरीक्षण करत आहेत. गुंतवणुकीतील कोणत्याही अडथळ्यांना त्वरित दूर केलं जाणार आहे.