Personal Loan Tips: लग्नसमारंभ, मेडिकल इमरजन्सी, शिक्षण किंवा इतर गरजांच्या वेळी अचानक पैशांची गरज भासते. अशा वेळी बहुतांश लोक बँकांकडून पर्सनल लोन घेणं पसंत करतात.
बँका विविध प्रकारचे कर्ज देतात, परंतु पर्सनल लोन सर्वात लोकप्रिय आहे, कारण त्यासाठी काही तारण ठेवण्याची गरज नसते आणि रकमेचा वापर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करता येतो. मात्र, लोन मंजूर होण्यासाठी फक्त सिबिल स्कोअर चांगला असणं पुरेसा नाही, तर काही इतर घटक देखील निर्णायक ठरतात.
निश्चित मासिक उत्पन्न
पर्सनल लोन मंजूर करण्याआधी बँक तुमच्या मासिक उत्पन्नाची खात्री करतात. यातून बँक पाहते की, तुम्ही ठरलेल्या वेळेत ईएमआय (EMI) भरू शकाल का. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना, ज्यांची पगार निश्चित असतो, त्यांना लोन सहज मिळतं. पण अस्थिर उत्पन्न असलेल्या लोकांबद्दल बँका साशंक असतात, कारण त्यांना वाटतं की, अशा लोकांकडून ईएमआय वेळेवर भरणं कठीण जाईल.
व्यवसायिकांना मात्र आपलं नियमित उत्पन्न दाखवण्यासाठी दस्तऐवज द्यावे लागतात. जर तुम्ही मोठ्या कंपनीत काम करत असाल, तर तुमचा लोन अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.
तरुणांना मिळते प्राधान्य
तुमचं वयदेखील पर्सनल लोन अर्जावर थेट परिणाम करतं. तरुण अर्जदारांना बँका प्राधान्य देतात, कारण त्यांच्याकडे उत्पन्न मिळवण्याचे अधिक संधी आणि वेळ असतो. ज्येष्ठ नागरिकांना बँका सहसा पर्सनल लोन देत नाहीत, कारण त्यांच्या कमाईच्या संधी कमी झालेल्या असतात. तसेच अल्पवयीनांना कर्ज देणं बँक नियमांनुसार शक्य नसतं.
आधीच घेतलेलं कर्ज
जर तुमच्याकडे आधीपासून इतर बँका किंवा वित्तसंस्थांकडून घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्ड ईएमआय असतील आणि तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग त्या कर्जांच्या फेडीमध्ये जात असेल, तर बँक तुम्हाला नवीन पर्सनल लोन देणे टाळतात. कारण अशा परिस्थितीत तुम्ही नवीन ईएमआय वेळेवर भरू शकाल का, हा धोका बँका विचारात घेतात.