Loan Default : आजकाल वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कमी कागदपत्रांमध्ये झटपट मिळत असल्याने ते लोकप्रिय होत आहे. बँकांसोबत वित्तीय संस्थादेखील आता वैयक्तिक कर्ज देतात. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात पर्सनल लोन फायदेशीर ठरत आहेत. मात्र, याची दुसरी काळी बाजूही समजून घेतली पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण लहान वैयक्तिक कर्जे (१०,००० रुपयांपेक्षा कमी) फेडण्यासाठी लोक सर्वात जास्त संघर्ष करत आहेत. फिनटेक बॅरोमीटरच्या अहवालानुसार, डिसेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घेतलेल्या या कर्जांचा सर्वात जास्त डीफॉल्ट दर होता. अहवालात म्हटले आहे की कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर सतत देखरेख ठेवली पाहिजे आणि व्यवसाय कर्जातील मूल्यांकनातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत.
सीआरआयएफ हाय मार्क आणि डिजिटल लेंडर्स असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या फिनटेक बॅरोमीटर (खंड II) नुसार, डिसेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांमधील डिफॉल्ट दर ४४% ने वाढला आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांचा (NBFC) पर्सनल लोन बाजारातील विस्तार झपाट्याने वाढला आहे. लहान कर्जांची वाढती संख्या डिजिटल कर्जाद्वारे आर्थिक समावेशनाला चालना देत असल्याचे दिसते. पण, कर्ज बुडण्याचा दर चिंता वाढवत आहे.
असुरक्षित व्यवसाय कर्जाची मागणी स्थिर
असुरक्षित व्यवसाय कर्ज (UBL) आणि मालमत्ता कर्ज (LAP) श्रेणींमध्ये १० लाखांपेक्षा कमी कर्जाची मागणी स्थिर राहिली. टॉप १०० शहरांबाहेरील प्रदेशांनी ४२% मूल्य आणि ४४% व्हॉल्यूमचे योगदान दिले. यातून लहान शहरी आणि ग्रामीण भागातही याचा प्रसार होत असल्याचे दिसत आहे.
जोखीम आणि क्रेडिट स्कोअरवर भर
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की उच्च आणि अत्यंत उच्च जोखीम कर्ज पोर्टफोलिओमध्ये घट झाली आहे. पण, कमी क्रेडिट हिस्ट्री असलेल्या आणि क्रेडिट स्कोअर नसलेल्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. जरी हे गट धोकादायक असले तरी, त्यांना औपचारिक क्रेडिट सिस्टीममध्ये आणणे आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देते.