vijay shekhar sharma : आजच्या डिजिटल युगात, सायबर गुन्हेगारी खूप वेगाने वाढत आहे. जे व्यक्तींपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांसाठी धोकादायक बनले आहेत. आपल्या सर्वांना दररोज सायबर गुन्हेगारांना सामोरे जावे लागते. पण जेव्हा देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएमच्या सीईओशी त्यांच्याच नावाने कोणीतरी संपर्क साधतो तेव्हा काय होते? शर्मा यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनाक्रम सांगितला आहे.
विजय शेखर शर्मा यांच्यासोबत घडलेला प्रकार
'पेटीएम' (Paytm) चे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांना सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांनाच 'विजय शेखर शर्मा' असल्याचे भासवून फसविण्याचा प्रयत्न केला! विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्यातील झालेले संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केलं आहे.
सायबर गुन्हेगाराचा ९३२७०२५५६२ या अनोळखी नंबरवरून मेसेज आला: "मी विजय शेखर शर्मा आहे. हा माझा नवीन व्हाट्सअॅप नंबर आहे. सेव्ह करा."
विजय शेखर शर्मा : "नक्कीच सर."
दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसेज आला
सायबर गुन्हेगार : "तुम्ही आता कंपनीत आहात का?"
विजय शेखर शर्मा : "हो."
सायबर गुन्हेगार : "मी सध्या मीटिंगमध्ये आहे आणि तुम्हाला काही काम करायचे आहे."
विजय शेखर शर्मा: "हो सर, तुम्हाला मीटिंगला कोणाला पाठवायचे आहे का?"
सायबर गुन्हेगार : "आता नाही. तुम्ही कंपनीचे खाते तपासा आणि मला सांगा की सध्या कंपनीत किती निधी उपलब्ध आहे?"
विजय शेखर शर्मा: "सर, मी वित्त क्षेत्रात नाही. तुम्ही त्यांना सांगा."
सायबर गुन्हेगार : "सध्या वित्त विभागाच्या ड्युटीवर कोण आहे?"
विजय शेखर शर्मा: "तुम्हीच सांगा."
सायबर गुन्हेगार : "माझा फोन फॉरमॅट केल्यापासून, माझ्या फोनमध्ये कोणतेही नंबर सेव्ह केलेले नाहीत. जर तुमच्याकडे वित्त विभागाचा नंबर असेल तर कृपया मला सांगा."
Hustler ! https://t.co/dmykHVFhB5pic.twitter.com/sM19cPTBOm
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) May 21, 2025
या घटनेतून हे स्पष्ट होते की सायबर गुन्हेगार किती चलाखीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांच्या नावाने बनावट अकाउंटद्वारे १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
जर तुम्हालाही असा मेसेज आला तर काय करावे?
- नंबर तपासा: मेसेज किंवा कॉल स्वतःच्या अधिकृत नंबरवरून आला आहे की अनोळखी नंबरवरून? बॉस/सीईओ सहसा त्यांचा अधिकृत नंबरच वापरतात.
- ईमेल आयडी तपासा: जर ईमेल आला असेल, तर तो कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवरून आहे का? (उदा. @companyname.com). सामान्य जीमेल किंवा याहू आयडीवरून आलेला ईमेल संशयास्पद असू शकतो.
- माहितीची मागणी: तुमचा सीईओ कधीही तुमच्याकडून कंपनीची अंतर्गत माहिती (उदा. बँक खात्यातील निधी) किंवा थेट पैसे मागणार नाही. अशा प्रकारची मागणी झाल्यास १००% ती फसवणूकच असते.
वाचा - सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
सायबर गुन्हेगारीची तक्रार कुठे कराल?
- जर तुम्ही सायबर फसवणुकीचे शिकार झाला असाल किंवा तुम्हाला अशी कोणतीही संशयास्पद घटना दिसली, तर तात्काळ त्याची तक्रार करा. राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० (तत्काळ संपर्क साधावा, विशेषतः आर्थिक फसवणूक झाल्यास)
- राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल: www.cybercrime.gov.in (येथे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता आणि आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तपासू शकता.)
- स्थानिक पोलीस ठाणे: जवळच्या पोलीस स्टेशनमधील सायबर सेलमध्ये जाऊनही तुम्ही तक्रार करू शकता.
- लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार नेहमीच तुमच्या भीतीचा किंवा अज्ञानाचा फायदा घेतात. त्यामुळे, कोणतीही संशयास्पद लिंक, ईमेल किंवा मेसेजला प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळा आणि जागरूक रहा!