Online Fraud : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण इतके वाढले आहे की, कधी, कुठे आणि कोण तुमच्या खासगी माहितीचा गैरवापर करेल, याचा अंदाज लावणेही कठीण झाले आहे. नुकतेच टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला हे अशाच एका फसवणुकीचे बळी ठरले. त्यांच्या पॅन कार्डचा वापर करून त्यांच्या नावावर बनावट कर्ज काढण्यात आले. ही घटना केवळ एक धोक्याची घंटा नसून, प्रत्येकासाठी हा एक गंभीर इशारा आहे. आपले पॅन कार्ड सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असू शकते. तुमच्या नावावर कुणी कर्ज तर घेतलेले नाही ना? याचे उत्तर तुम्ही काही मिनिटांत स्वतः शोधू शकता.
पॅन कार्डद्वारे फसवणूक
पॅन कार्ड हे केवळ प्राप्तिकर भरण्याचे साधन नाही, तर ती तुमची संपूर्ण आर्थिक ओळख आहे. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, मोठे व्यवहार करणे किंवा KYC अपडेट करणे—या प्रत्येक ठिकाणी पॅन आवश्यक असते. त्यामुळे, चुकीच्या हातात पॅनची माहिती लागल्यास, गुन्हेगार तुमच्या नावावर कर्ज घेऊन तुमची आर्थिक फसवणूक करू शकतात.
तुमच्या पॅनवर फसवणूक झाली आहे का, हे कसे तपासावे?
तुमच्या नावावर कोणतेही बनावट कर्ज चालू आहे की नाही, हे तपासण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासणे. सिबील, एक्सपेरियन, सीआरआयएफ हाय मार्क किंवा इक्विफॅक्स यांसारख्या कोणत्याही अधिकृत क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटला भेट द्या. तिथे तुमचा पॅन क्रमांक आणि आवश्यक माहिती टाकून तुमची क्रेडिट रिपोर्ट डाउनलोड करा.
या रिपोर्टमध्ये तुम्ही न घेतलेले कोणतेही कर्ज या रिपोर्टमध्ये दिसत आहे का? हे तपासा. कोणत्याही कर्जावर ईएमआय डिफॉल्ट किंवा थकबाकी दिसत आहे का? जर यापैकी कोणतीही गोष्ट संशयास्पद वाटली, तर समजा तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झालेला आहे.
फसवणूक आढळल्यास काय करायचं?
ज्या बँक किंवा एनबीएफसीमधून बनावट कर्ज दिसत आहे, त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा आणि त्यांना फसवणुकीची माहिती द्या. जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन 'पॅन कार्डचा गैरवापर' झाल्याची तक्रार त्वरित नोंदवा. हे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट रिपोर्टमधील चुकीची नोंद हटवण्यासाठी क्रेडिट ब्युरोच्या वेबसाइटवर 'डिस्प्यूट फॉर्म' भरून तक्रार दाखल करा. ही फसवणूक प्राप्तिकर विभाग आणि इतर संबंधित सरकारी यंत्रणांना कळवा.
वाचा - एका चुकीने सर्व संपले! सर्वात यशस्वी स्टार्टअप 'बायजू'च्या अपयशाची इनसाइड स्टोरी, नेमकं काय घडलं?
फसवणुकीपासून वाचण्याचे स्मार्ट मार्ग
- पॅन कार्डची प्रत देताना नेहमी त्यावर केवळ 'XYZ कामासाठी वापर" असे स्पष्टपणे लिहा.
- फक्त विश्वासार्ह आणि सुरक्षित वेबसाइट्सवरच पॅन कार्डची माहिती द्या.
- Form 26AS, AIS आणि आपला क्रेडिट स्कोअर वेळोवेळी तपासत राहा.
- संशयास्पद ईमेल, लिंक्स किंवा ॲप्समध्ये तुमचा पॅन क्रमांक कधीही देऊ नका.
