Home Loan : घर घेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते. पण, या स्वप्नपूर्तीसाठी घेतलेले होम लोन अनेकदा आनंदासोबत थोडीशी आर्थिक चिंताही घेऊन येते. होम लोन घेण्यापूर्वी याचे व्याज 'फिक्स्ड' आहे की 'फ्लोटिंग' आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. हा छोटा वाटणारा निर्णय तुमच्या पुढील 15-20 वर्षांच्या आर्थिक आरोग्यावर थेट परिणाम करू शकतो.
फिक्स्ड रेट- स्थिर पण तुलनेने महाग
फिक्स्ड रेट लोनमध्ये तुमची EMI दरमहा समान राहते. बाजारात कितीही चढ-उतार झाला तरी तुम्ही ठरावीक रक्कमच भरता, त्यामुळे बजेट ठरवणे सोपे जाते आणि मनाला स्थैर्य मिळते. पण या स्थैर्याची किंमत थोडी जास्त असते. साधारणपणे फिक्स्ड रेट लोनवरचा व्याजदर फ्लोटिंगपेक्षा 1 ते 1.5 टक्क्यांनी जास्त असतो. जर पुढे व्याजदर कमी झाले, तर फिक्स्ड रेट असलेल्या ग्राहकांना त्याचा काहीच फायदा मिळत नाही. म्हणजे इतर लोकांची EMI कमी झाली तरी तुम्ही तेवढीच रक्कम भरत राहते.
फ्लोटिंग रेट- स्वस्त पण जोखमीचा
फ्लोटिंग रेट होम लोनमध्ये व्याजदर बाजाराच्या स्थितीनुसार बदलतो. तो प्रामुख्याने RBI च्या रेपो रेटशी किंवा बँकेच्या बेंचमार्क रेटशी जोडलेला असतो. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा तुमची EMI ही आपोआप घटते, हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे. पण जोखीम अशी की, जर RBI दर वाढवते, तर EMIही वाढते आणि महिन्याचं बजेट बिघडू शकते. तरीही, दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर फ्लोटिंग रेट सामान्यतः स्वस्त ठरतो, कारण व्याजदर कायम उच्च राहत नाहीत.
फिक्स्डऐवजी फ्लोटिंग फायदेशीर का?
जर तुम्ही पूर्वी उच्च फिक्स्ड रेटवर लोन घेतले असेल आणि आता बाजारात दर कमी झाले असतील, तर बॅलन्स ट्रान्सफर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. याचा अर्थ, तुमचे कर्ज त्या बँकेत हलवा, जी कमी व्याजदर देत आहे. फक्त 0.5%-1% दरकपातीनेही संपूर्ण लोन कालावधीत लाखो रुपयांची बचत होऊ शकते. मात्र, ट्रान्सफर करताना बँक काही प्रोसेसिंग फी किंवा चार्जेस आकारते, त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी सर्व खर्चांचा विचार जरूर करा.
कोणासाठी कोणता पर्याय योग्य?
नोकरीत नवे, तरुण किंवा दीर्घकालीन लोन घेणारे: फ्लोटिंग रेट अधिक योग्य. जोखीम असली तरी दीर्घकाळात बचतीची शक्यता जास्त.
सेवानिवृत्तीच्या जवळ असलेले किंवा निश्चित बजेट ठेवू इच्छिणारे: फिक्स्ड रेट किंवा हायब्रिड (काही वर्षे फिक्स्ड, नंतर फ्लोटिंग) लोन चांगला पर्याय. यामुळे EMI स्थिर राहते आणि अचानक वाढीचा धक्का बसत नाही.
