What is Loan Transfer : भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रदिर्घ कालावधीनंतर रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंटने कमी करुन कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जासारख्या बँकांच्या किरकोळ कर्जावरील व्याजदरही कमी झाले आहेत. आरबीआयच्या या पावलानंतर बहुतांश बँकांनीही त्यांच्या कर्जाचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेकांना या निर्णयाचा फायदा झाला नाही. कारण, काही बँकानी व्याजदर कमी करण्याऐवजी वाढवले आहेत. तुम्ही अशाच कर्जदारांपैकी एक असाल तर काळजी करू नका. कारण, आज आम्ही तुम्हाला ईएमआय कमी करण्याचे पर्याय सांगणार आहोत.
आजकाल बँकांचे बहुतेक कर्ज व्याजदर हे आरबीआयच्या रेपो रेटसारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहेत. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यामुळे बँकांचे व्याजदरही कमी होतात. रेपो दर कमी झाल्यामुळे किरकोळ कर्जेही स्वस्त होतात आणि तुमचा ईएमआयही कमी होतो. काही बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले नाहीत. अशा परिस्थितीत या बँकांकडून कर्ज घेणारे ग्राहक त्यांचे कर्ज बदलून किंवा बॅलन्स हस्तांतरणाद्वारे व्याजदर कमी करू शकतात.
बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय?
जर तुमची विद्यमान बँक उच्च व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्ही अशी बँक शोधा जिथे व्याजदर कमी आहे. अशा बँकेत तुमचे कर्ज ट्रान्सफर करुन खूप पैसे वाचवू शकता. या प्रक्रियेला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात. आजकाल बहुतांश बँका ही सुविधा देत आहेत. बॅलन्स ट्रान्सफर अंतर्गत, नवीन बँक ग्राहकांना कमी व्याज देते, जे त्यांना ईएमआय कमी करण्यात देखील मदत करते.
कर्ज हस्तांतरणाचा फायदा कसा होतो?
कर्ज हस्तांतरणाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, इतर बँक कमी व्याजदर देते, ज्यामुळे EMI कमी होण्यास मदत होते. समजा तुमचे ३० लाख रुपयांचे गृहकर्ज ९.५० टक्के व्याजाने चालू आहे. जर तुम्ही तुमची शिल्लक कमी व्याज देणाऱ्या बँकेकडे म्हणजेच ८.५० टक्के ट्रान्सफर केली असेल, तर व्याजदर १ टक्क्यांनी कमी होईल. जर तुम्ही २० वर्षांसाठी कर्ज घेतले असेल, तर जुन्या व्याजदरानुसार तुम्ही २७,९६४ रुपये EMI भरत आहात आणि एकूण ३७,११,३४५ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. पण, हेच व्याज जर ८.५ टक्के दराने मिळालं तर तुमचा हप्ता २६,०३५ रुपयांवर येईल. अशाप्रकारे, सुमारे २ हजार रुपयांची बचत होईल, जी वार्षिक सुमारे २४ हजार रुपये असेल. तर केवळ ३२,४८,३२७ रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. यात तुमची सुमारे ४.५ लाख रुपयांची बचत होईल.
बॅलन्स ट्रान्सफर करण्याचे नियम काय?
बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर. जेणेकरून इतर बँका तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज हस्तांतरण देऊ शकतील. याशिवाय अनेक बँका बॅलन्स ट्रान्सफरसाठी शुल्क देखील आकारतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या नफा-तोट्याचे मूल्यांकन करूनच निर्णय घ्यावा. तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफरचा फायदा फक्त कर्जाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मिळतो, जेव्हा बँका तुमच्या EMI पैकी बहुतांश व्याजदर आकारतात.