Inactive Bank Account : तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे जुने बँक खाते विसरले आहे का? किंवा त्या खात्यात दोन वर्षांहून अधिक काळ कोणतेही व्यवहार झालेले नाहीत, ज्यामुळे ते निष्क्रिय झाले आहे? जर उत्तर 'हो' असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता तुम्हाला तुमचा हा अनक्लेम्ड पैसा परत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.
देशभरात निष्क्रिय खात्यांमध्ये आणि दहा वर्षांहून अधिक जुन्या 'अनक्लेम्ड डिपॉझिट्स'च्या स्वरूपात कोट्यवधी रुपये पडून आहेत. नियमानुसार, १० वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केला गेला नाही, त्या ठेवी बँका आरबीआयच्या DEA (Depositor Education and Awareness) फंडमध्ये हस्तांतरित करतात. परंतु, आता तुम्ही किंवा तुमचे कायदेशीर वारस हे पैसे कधीही परत मिळवू शकता. आरबीआयने ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की, फक्त ३ सोप्या टप्प्यांमध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतील.
खात्यातील पैसा 'निष्क्रिय' कधी होतो?
आरबीआयच्या माहितीनुसार, एखादे बँक खाते जर २ वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिले, तर त्या खात्यातील शिल्लक रक्कम 'इनएक्टिव्ह डिपॉझिट्स' म्हणून गणली जाते. जर हे खाते १० वर्षांसाठी निष्क्रिय राहिले, तर बँका ही रक्कम आरबीआयच्या DEA फंडमध्ये हस्तांतरित करतात.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या पैशांवर दावा करण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही. हा पैसा तुमचा आहे आणि तो कधीही परत मिळवण्यासाठी तुम्ही दावा दाखल करू शकता.
तुमचा अनक्लेम्ड पैसा कसा शोधायचा?
आरबीआयने तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा अनक्लेम्ड पैसा शोधण्यासाठी २ सोपे मार्ग सांगितले आहेत.
RBI च्या वेबसाइटवर शोधा
तुम्ही थेट आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता. https://www.rbi.org.in/Scripts/DepositorEducation.aspx
येथे तुम्ही स्वतःचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे नाव शोधू शकता. तुम्हाला कोणत्या बँकेत किती पैसा जमा आहे, याची संपूर्ण यादी मिळू शकेल.
विशेष शिबिरांमध्ये मदत घ्या
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'अनक्लेम्ड ॲसेट्स' वर विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमध्ये थेट भेट देऊन तुम्ही आवश्यक मदत मिळवू शकता.
वाचा - ५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
फक्त ३ स्टेप्समध्ये करा क्लेम!
- एकदा तुम्हाला तुमचा अनक्लेम्ड पैसा कोणत्या बँकेत आहे हे कळले की, तो परत मिळवण्यासाठी खालील ३ सोप्या पायऱ्या वापरा.
- कोणत्याही बँक शाखेत जा: पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला मूळ बँकेत जाण्याची गरज नाही. तुमच्या आवडीच्या कोणत्याही बँक शाखेत भेट द्या. तेथे 'क्लेम फॉर्म' भरा.
- केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे: ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी केवायसी पुरावे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड) द्यावे लागतील. जर वारसदार दावा करत असतील, तर मृत्यू प्रमाणपत्र सारखी कायदेशीर कागदपत्रे जोडावी लागतील.
- तपासणीनंतर पैसे मिळतील: बँक तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि त्यानंतर आरबीआयच्या DEA फंडमधून तुमची संपूर्ण रक्कम हस्तांतरित करेल. ही प्रक्रिया जलद असून यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जात नाही.
