artificial intelligence : सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची सगळीकडे चर्चा पाहायला मिळत आहे. एआय अनेक क्षेत्रातील नोकऱ्या खाणार असल्याची भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच बँकिंग क्षेत्रात याचा मोठा धोका असल्याचेही बोलले जात आहे. जागतिक बँक प्रमुख डीबीएस ग्रुपचे सीईओ पीयूष गुप्ता यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. बँकेंत ऑपरेशन्समध्ये एआय वापरल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल, असं त्याचं म्हणणं आहे. येत्या ३ वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.
यापूर्वीही बँकिंग क्षेत्रात संगणकाचा वापर सुरू झाल्याने प्रभाव पडला होता. मात्र, एआय पूर्णपणे वेगळे आहे. पूर्वी स्वीकारलेल्या इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा याचा खूप प्रभाव पडणार आहे. सिंगापूर बँकेच्या सर्वोच्च पदावर असूनही आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच बँकिंग क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासाठी अडचण येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे एआयने अनेक ठिकाणी माणसाची जागा घेतली आहे.
इतर क्षेत्रातील नोकऱ्यांनाही एआयचा धोका
गुप्ता म्हणाले, गेल्या १० वर्षात आमच्या ग्रुपमध्ये एकही नोकरी गेली नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. पुढील ३ वर्षात आम्ही आमचे कर्मचारी ४,००० किंवा १० टक्के कमी करणार आहोत. एआय स्वस्तः विचार करुन काम करते. त्याच्याकडे नवीन गोष्टी शिक्षण्याची ताकद आहे. त्यामुळेच ते इतर तंत्रज्ञानाहून वेगळे ठरते. आधीची तंत्रज्ञान ही ठरवून दिलेली कामेच करत होती. त्यामुळे येणारा काळात फक्त बँकिंग नाही तर इतर क्षेत्रातही नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते.
कोणत्या कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होईल?
डीबीएस ग्रुपच्या सीईओ म्हणाले की, २०१६-१७ मध्ये, बँकेत डिजिटल परिवर्तन सुरू करण्यात आले. याचा १६०० लोकांवर परिणाम झाला. परंतु, सर्व युनियन आणि इतर प्रतिनिधींशी सल्लामसलत करून त्यांच्या नोकऱ्या वाचवण्यात आल्या. एआयच्या काळात कोणाचीही नोकरी वाचवणे आव्हान असणार आहे.
एआयमुळे नवीन संधीही निर्माण होणार
एआयमुळे बँकिंग क्षेत्रात बदल होणार हे निश्चित आहे. काही नोकऱ्या कमी होतील, पण त्याचबरोबर नवीन संधी निर्माण होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये शिकून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या बदलासाठी तयार राहणे आवश्यक आहे. एआयमुळे डेटा विश्लेषण, सायबर सुरक्षा आणि नवीन उत्पादन विकास यांसारख्या क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी निर्माण होतील.