Bank Account : अनेकदा आपल्याला असे वाटते की, आपल्या बँक खात्यात असलेले पैसे आपल्या परवानगीशिवाय कोणीही काढू शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या हे खरे असले तरी, बँकिंग नियमावलीमध्ये अशा काही पळवाटा आणि अटी आहेत, ज्यानुसार बँक तुमच्या खात्यातून पैसे कापून घेऊ शकते. हे नियम नेमके काय आहेत आणि तुमची आर्थिक सुरक्षा कशी जपावी, यावर टाकलेला हा विशेष प्रकाशझोत.
कोणत्या परिस्थितीत बँक पैसे कापू शकते?
१. पूर्वसंमती
जेव्हा तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 'ऑटो-डेबिट'चा पर्याय निवडता, तेव्हा बँक दरमहा ठरलेल्या तारखेला पैसे कापते. तसेच विमा प्रीमियम, SIP किंवा नेटफ्लिक्स/ॲमेझॉन सारख्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही एकदा मान्यता दिली की, बँक पुन्हा न विचारता पैसे वळते करते.
२. सेवा शुल्क आणि दंड
खाते उघडताना आपण ज्या अटींवर स्वाक्षरी करतो, त्यात विविध शुल्कांचा उल्लेख असतो.
किमान शिल्लक : खात्यात ठराविक रक्कम न ठेवल्यास दंड.
इतर शुल्क : एसएमएस अलर्ट चार्ज, एटीएम ट्रांजॅक्शन फी किंवा डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क बँक थेट तुमच्या बॅलन्समधून वजा करते.
३. 'राईट ऑफ सेट-ऑफ'
हा बँकिंगचा एक असा नियम आहे जो अनेकांना माहिती नसतो. जर तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि त्याचे हप्ते थकवले असतील, तर बँकेला तुमच्या त्याच बँकेतील दुसऱ्या बचत खात्यातून पैसे कापून घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो.
४. कायदेशीर आदेश
जर आयकर विभागाने नोटीस पाठवली किंवा न्यायालयाचा एखादा आदेश असेल, तर बँक ग्राहकाला न विचारता त्यांच्या खात्यातील रक्कम संबंधित विभागाला देण्यासाठी बांधील असते.
कपात चुकीची असू शकते का?
अनेकदा मानवी चूक किंवा तांत्रिक बिघाडामुळे नुकसान होऊ शकते.
डबल चार्ज : एकाच व्यवहारासाठी दोनदा पैसे कट होणे.
सायबर फसवणूक : जर तुम्ही कोणतीही संमती दिली नसेल आणि ती बँकेची फी देखील नसेल, तर तो सायबर फ्रॉडचा प्रकार असू शकतो.
वाचा - नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल
आर्थिक सुरक्षेसाठी 'हे' ३ मंत्र लक्षात ठेवा
स्टेटमेंट तपासा : दरमहा तुमचे बँक स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा. पैसे कोणत्या नावाने आणि का कट झाले आहेत, याची खात्री करा.
बँकेशी संपर्क : जर तुम्हाला एखादा व्यवहार संशयास्पद वाटला, तर त्वरित बँकेच्या कस्टमर केअरला कळवा किंवा शाखेत जाऊन लेखी तक्रार द्या.
अलर्ट चालू ठेवा : तुमच्या फोनवर एसएमएस आणि ई-मेल अलर्ट नेहमी चालू ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्यवहाराची माहिती तुम्हाला तत्काळ मिळेल.
