Bank unions strike : या महिन्यात तुमची बँकेची काही कामे राहिली असतील तर लवकर उरकून घ्या. कारण, मार्चमध्ये बँका २ दिवस बंद असणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स २४ आणि २५ मार्च रोजी २ दिवसांचा देशव्यापी संपावर ठाम आहेत. कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबत बैठक झाली होती. मात्र, यात कोणताही तोडगा निघाला नसल्याने संघटना आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
आयबीए सोबतच्या बैठकीत, कर्मचारी संघटनेतील सदस्यांनी सर्व कॅडरमध्ये भरती आणि ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईजचे (एनसीबीई) सरचिटणीस एल चंद्रशेखर म्हणाले की, बैठक होऊनही प्रमुख समस्यांचे निराकरण झालेले नाही. नऊ बँक कर्मचारी संघटनांच्या युनिफाइड बॉडी यूएफबीयूने या मागण्यांसाठी यापूर्वी संपाची घोषणा केली होती.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
आयबीए सोबत झालेल्या बैठकीत, UFBU शी संबंधित सर्व कर्मचारी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या, ज्यात सर्व कॅडरमध्ये भरती आणि ५ दिवसांचा कामाचा आठवडा हे प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. मात्र या प्रमुख मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज (NCBE) सरचिटणीस एल. चंद्रशेखर यांनी या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
कोणत्या मागण्यांसाठी संप सुरू आहे?
- सरकारी बँकांमधील रिक्त पदे भरावीत : कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांवर तातडीने नियुक्त्या करण्यात याव्यात.
- परफॉर्मेन्स रिव्यू आणि इन्सेटीव योजना मागे घ्याव्यात : युनियन्सचे म्हणणे आहे की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.
- बँकांच्या कामकाजात 'मायक्रो-मॅनेजमेंट'वर बंदी घालावी : UFBU ने आरोप केला आहे की सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होत आहे.
- ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा : ही मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढवली जावी, जेणेकरून ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या बरोबरीने असेल आणि त्याला आयकरातून सूट मिळेल.
४ दिवस बँक सलग बंद राहणार?
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनुसार, २४ आणि २५ मार्च रोजी देशभरातील ९ बँका संपावर जाणार आहेत. तर २२ मार्चला चौथा शनिवार आणि २३ मार्चला रविवार असल्याने बँका सलग ४ दिवस बंद राहतील. तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास ते २२ मार्चपूर्वी पूर्ण करावे.
सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसण्याची खात्री आहे. त्यामुळे सरकारी तसेच सर्वसामान्यांचे काम विस्कळीत होणार आहे. बँकांच्या ४ दिवसांच्या संपाचा देशातील व्यावसायिक कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे.