Festive Season Sales : सणासुदीचा काळ म्हणजे भारतीयांसाठी खरेदी करण्याचे पर्व असते. याच संधीचा फायदा उचलण्यासाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मोठ्या ऑफर्स आणि सेल सुरू करतात. गॅजेट्स, होम अप्लायन्स आणि इतर वस्तूंवर मिळणाऱ्या जबरदस्त सवलतींचा फायदा घेण्यासाठी ग्राहक भरभरून खरेदी करतात. मात्र, या मोहात अनेक ग्राहक गरजेपेक्षा जास्त खरेदी करतात आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडतात.
जर तुम्हालाही सणासुदीच्या खरेदीमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर नकारात्मक पद्धतीने प्रभावित होऊ नये, असे वाटत असेल तर खालील गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
सवलतींचा मोह टाळता येत नाही, पण...
सेलमध्ये प्रत्येक वस्तूवर बंपर सूट मिळते, शिवाय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त लाभ मिळतो. यामुळे अनेकदा ग्राहक अनावश्यक वस्तूंवरही आकर्षित होतात. जास्त खरेदी करण्यासाठी अनेकजण क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज किंवा जास्तीच्या ईएमआयचा आधार घेतात.
तुम्ही ही चूक करत आहात का?
खरेदी करताना लक्षात ठेवा की, वस्तू तेवढ्याच किमतीची असावी, जेवढी रक्कम तुम्ही सहज परतफेड करू शकाल. गरजेपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याचे परिणाम क्रेडिट स्कोअरवर थेट होतात.
बिल भरण्यास उशीर झाल्यास मोठा फटका
- सेलमध्ये उत्साहाच्या भरात लोक भरपूर वस्तू खरेदी करतात, पण जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल किंवा ईएमआय भरण्याची वेळ येते, तेव्हा त्यांची तारांबळ उडते.
- जर तुम्ही वेळेवर ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही, तर याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
- खराब क्रेडिट स्कोअरमुळे भविष्यात तुम्हाला गृह कर्ज किंवा इतर कोणतेही मोठे कर्ज घेताना अडचणी येतात आणि जास्त व्याजदर भरावा लागतो. सेलच्या ऑफर्स पाहून लोक ही चूक करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात.
वाचा - NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
क्रेडिट स्कोअर सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
सणासुदीच्या खरेदीमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब न होता, उलट तो अधिक चांगला व्हावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
- खरेदीची यादी तयार करा: सेलमध्ये काय खरेदी करायचे आहे, त्याची गरजेनुसार यादी तयार करा. अनावश्यक वस्तूंवर पैसे खर्च करणे टाळा.
- निधी तयार ठेवा: खरेदीसाठी लागणारा निधी आधीच बाजूला काढून ठेवा. यामुळे आर्थिक बोजा वाढणार नाही आणि तुम्हाला बिल भरण्याची चिंता करावी लागणार नाही.
- उत्पन्नानुसार खरेदी: तुमच्या परतफेडीच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू नका. तुम्ही किती कर्ज किंवा ईएमआय सहज फेडू शकता, याचा अंदाज घ्या.
- वेळेवर परतफेड: क्रेडिट कार्डचे बिल किंवा कर्जाचे हप्ते नेहमी वेळेवर भरा. यामुळे क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो.