लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँकांसाठी ‘पाच दिवसांचा आठवडा’ लागू करावा, ही मुख्य मागणी आहे. हा संप यशस्वी झाल्यास सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात २५ तारखेला रविवार व २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर लगेच २७ तारखेला संपाचा इशारा देण्यात आल्याने बँकांचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहू शकते. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर वित्तीय कामांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे मागणी?
- बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असते. उर्वरित दोन शनिवारीदेखील सुटी मिळावी, अशी मागणी कर्मचारी संघटना गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.
- मार्च २०२४ मध्ये झालेल्या वेतन करारामध्ये ‘आयबीए’ व ‘यूएफबीयू’ दरम्यान या मागणीवर सहमती झाली होती. मात्र, सरकारकडून अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
