Amazon's investments in the infrastructure, technology and logistics sectors | अ‍ॅमेझॉनची गुंतवणूक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये

अ‍ॅमेझॉनची गुंतवणूक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये

बंगळुरू : २0२५ पर्यंत भारतात १0 लाख नवे रोजगार निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम आयएनसी’ने शुक्रवारी केली. भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून अ‍ॅमेझॉन उपकार करीत नाही, असे वक्तव्य वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आदल्या दिवशीच केले असून, या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉनच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होते.

रिटेल क्षेत्रातील अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्ट समर्थित फ्लिपकार्टला भारतातील पारंपरिक दुकानदारांकडून तीव्र विरोध आहे. या बलाढ्य अमेरिकी कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप पारंपरिक व्यावसायिकांच्या संघटनांकडून वारंवार केला जात आहे. संघटनांच्या दबावामुळे सरकारने रिटेल क्षेत्रातील कंपन्यांसाठीचे नियम कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे बुधवारी भारत दौºयावर आले आहेत. त्यांच्या वतीने शुक्रवारी एक निवेदन जारी करण्यात आले.
बेझोस यांच्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी पाच वर्षांत १0 लाख रोजगार निर्माण व्हावेत, यासाठी आम्ही गुंतवणूक करीत आहोत. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान व रसद (लॉजिस्टिक्स) या क्षेत्रांत ही गुंतवणूक करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी बुधवारी बेझोस यांनी म्हटले होते की, ‘छोट्या व्यावसायिकांना आॅनलाइन आणण्यासाठी कंपनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. २0१४ पासून कंपनी ५.५ अब्ज डॉलर गुंतविण्यास वचनबद्ध आहे. त्या व्यतिरिक्त ही नवी गुंतवणूक असेल.’ त्यानंतर पीयूष गोयल यांनी गुरुवारी म्हटले होते की, ‘भारतात गुंतवणूक करीत आहेत, म्हणजे ते काही उपकार करीत आहेत, असे नव्हे.’
बेझोस यांच्या भारतभेटीच्या आधी भारतीय स्पर्धा आयोगाने अ‍ॅमेझॉनविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. पारंपरिक दुकानदारांनी कंपनीवर व्यावसायिक स्पर्धाविषयक नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्या अनुषंगाने ही चौकशी होत आहे. 

वक्तव्याचा विपर्यास : गोयल
अ‍ॅमेझॉन कंपनी १ अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक करून भारतावर कोणतेही उपकार करीत नाही, असे वक्तव्य गुरुवारी करणारे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी काहीशी माघार घेतली. ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, भारतीय कायद्याच्या अधीन राहूनच परकीय गुंतवणूक करता येईल.

भारतीय कायदे व नियम परकीय गुंतवणूकदारांनी पाळायलाच हवेत, असे आपण कालही म्हटले होते, पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भारतातील लहान व्यापारी व उद्योजक यांच्या हिताला बड्या गुंतवणूकदारांनी हानी पोहाचविता कामा नये. त्यांच्याकडे लाखो वा करोडो रुपये नाहीत, म्हणून त्यांचे नुकसान करता कामा नये, असे आपल्या म्हणण्याचा हेतू होता.

Web Title: Amazon's investments in the infrastructure, technology and logistics sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.