निरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर आणि वीर या धरणांतून सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वीर धरणाच्यापाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.
त्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
निरा खोऱ्यातील धरणांमध्ये सध्या सरासरी ५३.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी पिके घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
बारामती, इंदापूर, माळशिरस फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना जीवनदायिनी असलेल्या निरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, निरा देवधर व वीर धरणांचा खूप मोठा आधार राहिलेला आहे.
याच धरणातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांनी बाराही महिने तरकारी पिके तसेच फळबागा घेऊन आपली उन्नती साधली आहे. या धरणांमध्ये ५३.८८ टक्के पाणीसाठा होता.
४८ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर, निरा देवधर, वीर आणि गुंजवणी या चार धरणात सध्या २६.०४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला या चार धरणांत २२ टीएमसी म्हणजे ४५ टक्के पाणीसाठा होता.
परंतु, यावर्षी पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे निरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील शेतीला व पिण्याचे पाणी पुरेल इतका समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे निरा खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळच्या वेळी उसाला पाणी मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
निरा खोऱ्यातील धरणांची स्थिती टक्केवारी
◼️ भाटघर : ५३.३२
◼️ वीर : ५३.१२
◼️ निरा देवधर : ५२.४३
◼️ गुंजवणी : ५१.३०
चाऱ्याचा प्रश्न मिटला
◼️ यावर्षी गहू, हरभरा व इतर कडधान्यांना चांगला उतारा आला आहे.
◼️ या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरकारी पिकांबरोबर फळबागाही हिरव्यागार आहेत.
◼️ काढणी झालेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्याचे उत्पादन घेतले आहे.
◼️ त्यामध्ये कडवळ, मका, मूरघास ही पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.
◼️ त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्नमार्गी लागलेला आहे.
वीर धरणातून निरा डावा कालव्यात ८२७ क्युसेकने विसर्ग चालू आहे. निरा उजवा कालवा १ हजार ५५० क्यूसेकने सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या व कालव्यावर शेती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची सिंचनाची अडचण दूर होणार आहे. - राहुल मिसाळ, उपअभियंता वीर धरण
अधिक वाचा: उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर 'हे' फळ ठरतंय अंत्यत गुणकारी; जाणून घ्या सविस्तर
