Join us

'बीड'ला तारणारा पाऊस कधी? पावसाळ्याचे ७१ दिवस संपले तरीही २८ प्रकल्प जोत्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:00 IST

Water Shortage In Beed : मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत.

मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत.

दुसरीकडे लहान मोठ्या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा केवळ ४० टक्केच आहे. ऑगस्टमधील २० व सप्टेंबर महिन्यातील ३० अशा एकूण ५० दिवसांमध्ये बरसणारा पाऊस तारणार का? याची चिंता लागलेली आहे.

मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई स्थिती पूर्णतः बदलून गेली होती. अगदी १० जूनपर्यंत गेवराईसह इतर तालुक्यातील शेतजमिनीतील वाफसे झाले नव्हते. त्यामुळे जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.

आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरी ५६६ मिमीच्या तुलनेत केवळ २४४ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. झालेल्या पावसाचे प्रमाण केवळ ४४ टक्के असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. कमी पाऊस असल्याने धरणसाठ्यातील वाढदेखील थांबली आहे. खंड-खंड पावसामुळे पुरेसा पाणीसाठा होत नसल्याची स्थिती आहे.

मागील दोन महिन्यांत चार ते पाच वेळाच मोठे पाऊस झालेले आहे. त्याचा आधार धरणांना झाला आहे. मात्र, अद्यापही सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने दिवाळीनंतर जिल्हावासियांना पाण्याची चिंता सतावणार असल्याचे दिसते.

माजलगाव प्रकल्पात २७ टक्के पाणी

माजलगाव प्रकल्पात २७ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातून पाणी शहरास पिण्यासाठी सोडले जाते. तसेच माजलगाव प्रकल्पावर परिसरातील शेती अवलंबून आहेत. धरणातील पाण्यावर या भागातील ऊस, कापूस पिके जगतात; परंतु यंदा धरणात पाणी कमी आहे. त्यामुळे पुढील कालावधीत धरण भरले नाही तर उसासाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल की नाही याबाबत शंका आहे.

पिकांसाठी पाऊस लाभदायक

जून महिन्याच्या अखेरीस व १८ जुलैनंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. मागील आठवड्यात झालेल्या पावसाचा मोठा दिलासा पिकांना मिळाला आहे. त्यामुळे पिकांसाठीच्या पाण्याची सोय आपोआप झाली आहे. अनेक ठिकाणची पिके आता बहरात येऊ लागली आहेत.

तीन प्रकल्प अद्यापही कोरडे

बीड जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण १६७ पाणीसाठा प्रकल्पापैकी २७ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत.

• ७५ टक्के भरलेले १० तर ५० ते ७५ टक्के भरलेले १७ प्रकल्प आहेत. २५ ते ३० टक्के भरलेले ४५ प्रकल्प, २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले ३७ प्रकल्प, जोत्याखाली असलेले २८ तर ३ प्रकल्प कोरड आहेत.

सप्टेंबरमध्ये बदलणार परिस्थिती ?

• मागच्या काही वर्षांचा आढावा घेतला तर सप्टेंबर महिन्यात गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो व परिस्थिती पूर्णतः बदलून गेली होती.

• यंदा पाणीसाठा फारसा नसला तर सप्टेंबर महिन्यात ही परिस्थिती बदलून जाईल अशी अपेक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांना आहे.

...अशी आहे पाणी परिस्थिती

तालुका एकूण प्रकल्प उपयुक्त पाणीसाठा (द. ल. घ. मी. मध्ये)
बीड २१ ४७.२३४ 
गेवराई ७ ०.६२१ 
शिरूर ११ १३.९५८ 
पाटोदा  १३ १८.२६५ 
आष्टी २९ ४०.६४८ 
केज १५ ३.७०३ 
धारूर ७ ५.०८६ 
वडवणी १० ४१.७८५ 
अंबाजोगाई १२ ५.९०६ 
परळी १३ १६.७२२ 
माजलगाव ५ ८६.७६८ 
बीआयडी २४ ३०.९४१८ 
एकूण १६७ ३११.६४६ 

हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

टॅग्स :बीडपाणीधरणनदीमराठवाडाशेती क्षेत्रपाणी टंचाईपाणी कपातमाजलगाव धरण