मुंबई : देशभरातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह (मायनस) असणार असून, त्याचा हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
त्यामुळे राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या मान्सूनचा प्रवास लांबण्याची चिन्हे आहेत. परिणामी मुंबईसह राज्यभरातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होईल.
याचे फलित म्हणून दिवाळीपर्यंत देशासह राज्यात व मुंबईमधून अधून-मधून पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली.
पावसाळा आणि हिवाळ्याच्या मधल्या काळात हवामानात मोठी स्थित्यंतरे होत असतात. मान्सूनच्या सुरुवातीला निगेटिव्ह आयओडी सक्रिय असेल आणि त्याचा हवामानावर परिणाम झाला तर पावसाचे प्रमाण कमी असते.
पावसाळ्याच्या शेवटी निगेटिव्ह आयओडी सक्रिय असतो तेव्हा मान्सून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत असतो. यावर्षी निगेटिव्ह आयओडीमुळे उत्तर भारतासह लगतच्या परिसरात हवामानात उल्लेखनीय बदल होण्याचे संकेत आहेत.
१७ सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावर्षी २२ सप्टेंबरनंतर उत्तर-पश्चिम भारतातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होईल. हा प्रवास सुरू झाल्यानंतर काही दिवसांत त्याचा प्रवास खोळंबू शकतो. याचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील. पितृपक्षात पावसाचे प्रमाण कमीच राहील. तर नवरात्रौत्सवात पुन्हा शेवटच्या दिवसांत हलक्या सरींची शक्यता आहे. - अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार