Join us

मोसमी पावसाला पोषक वातावरण; पुढील ३-४ दिवसात राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:55 IST

Monsoon Latest Update राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे.

तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी मराठवाड्यातील काही भागात १२ ते १४ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, गोवा येथे १२ आणि १५ जून दरम्यान मुसळधार तर १३, १४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये.

वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करुन ठेवावा, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अधिक वाचा: राज्यात १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर होणार 'एआय'ने ऊस शेती, अनुदानही मिळणार; वाचा सविस्तर

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामान अंदाजमराठवाडाविदर्भमहाराष्ट्रमोसमी पावसाचा अंदाजपेरणीखरीपशेतकरीशेती