सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये मध्यम आणि अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे.
तीन महिन्यांत या पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता असून भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे आहेत. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील तलाव, नद्या, ओढे, नाले, विहिरी यामध्ये भरपूर पाणीसाठा झाला होता. पीक हंगाम आणि द्राक्ष बागा बऱ्याच प्रमाणात पार पडल्या आहेत. पण सध्या तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
अवघ्या महिन्या दीड महिन्यातच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर हे तलाव टेंभू किंवा म्हैसाळ योजनेतून भरून घेणे आवश्यक आहे, तरच उन्हाळ्यात टंचाईवर मात होऊ शकते.
तलावांमधील सध्याचा पाणीसाठा (आकडे द.ल.घ.मी.)
कुची - ५२.१२
रायवाडी - ५९.४९
लांडगेवाडी - मृतसंचयी पाणीसाठा
लंगरपेठ - ४२.६३
नांगोळे - १६.८४
बोरगाव - १५.८४
हरोली - १७.०९
घोरपडी - ३०.५८
बंडगरवाडी - ३२.४५
दुधेभावी - १०७.३०
बसाप्पावार्ड - २६६.६७
