नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्टयात तसेच धरण परिसरात गत महिन्यात झालेल्या संततधार पावसाने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाली होती. यावर्षी भोजापूर धरण जून महिन्याच्या अखेरीस ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या एक दोन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण तुडुंब भरून वाहण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
सिन्नर व संगमनेरी तालुक्यातील भागासाठी वरदान ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणात बुधवारी (दि. २) सकाळी ९८ टक्के पाणीसाठा झाला होता. धरण परिसरात जून अखेर २४७मिलीमीटर पावसाची नोंद पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यनमापकावर झाली आहे. ३६१ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या भोजापूर धरणात ३५५ दशलक्ष घनफूट इतका साठा झाला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत धरणामध्ये केवळ चार ते पाच टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा होता. एप्रिल महिन्यात धरणात केवळ मृतसाठा शिल्लक होता. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने धरणात १२ टक्के पाणीसाठा झाला होता.
गेल्या पंधरवड्यात म्हाळुंगी नदीच्या लाभक्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे हा साठा एकाच दिवसात ६५ टक्क्यांवर पोहोचला. त्यानंतर हळूहळू पाण्याची आवक सुरू राहिल्याने हा साठा आता ९.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
एखाद दूसरा जोराचा पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी नदीतून धरणात ४० ते ५० क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. सिन्नर तालुक्यातील मनेगावसह २२ गावे, कणकोरीसह पाचगावे, संगमनेरच्या निमोणसह पाचगावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भोजापूर धरणावर कार्यरत आहेत.
धरणाच्या पाण्यावर भागते ३२ गावांची तहान
सिन्नर मधील २७ आणि संगमनेर तालुक्यातील पाच, अशा ३२ गावांची तहान भोजापूर धरणातील पाण्यावर भागवली जाते. याशिवाय दोडी येथील चार व नांदूरशिंगोटे येथील एक पाणी वापर संस्था कार्यरत आहे. भोजापूर धरण यावर्षी जुलै महिन्यात भरणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पूरपाणी परिसरात आल्यास खरीप हंगामातील पिकांना लाभ होतो.