धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे.
यामुळे सध्या प्रकल्पात ७० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी दिलासा मिळणार आहे. संपूर्ण पावसाळा संपला तरी एक थेंब जलसाठा यावर्षी नवीन गोळा झाला नाही. शेतशिवाराच्या बाहेर पावसाचे पाणी निघाले नाही.
परिणामी, नदी-नाले वाहिले नसल्यामुळे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल, म्हणून या प्रकल्पात यावर्षी निम्माच जलसाठा शिल्लक होता. परंतु, आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती धरणात १० टक्क्यांनी जलसाठा वाढला असून, ८० सें.मी. पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे.
तर पाणी शेताच्या बांधापर्यंतच न्या :
• यावर्षी मालपूरसह परिसरातील चुडाणे, सुराय, अक्कलकोस, मांडळ येथील सिंचन प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे अस्तित्वात आहेत. मात्र, संबंधित क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्यामुळे कोरडेठाक आहेत.
• यामुळे विहिरींचा जलस्रोत कमालीचा घटला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे अमरावती मध्यम प्रकल्पातील पाणी शेताच्या बांधापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
पोटचारीचे काम करा!
• दरम्यान, मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातून आतापर्यंत चुडाणे, चौत, चोरझिरा, कलवाडे, चुडाणे, अक्कलकोस, सुराय शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोटचाऱ्यांअभावी पाणी शेताच्या पोहोचत नाही.
• यासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून मुख्य वितरिका तसेच उपवितरिका यातून निघणाऱ्या पोटचाऱ्या करण्यासाठी आता पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.
धरणात जवळपास नऊ ते दहा टक्के पाणी आलेले आहे आणि पातळीत सुमारे ८० सेंटीमीटरने वाढ झालेली आहे. अद्याप आवक सुरू असून, पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु, धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार नाही. - पीयुष पाटील, क. अभियंता, अमरावती मध्यम प्रकल्प, मालपूर
केवळ डाव्या व उजव्या कालव्यातुन पाणी फिरते. यामुळे कालव्या लगतच्या शेतकऱ्यांच्या विहीरीचा जलस्रोत वाढतो. प्रत्यक्ष शेतात थलणाचे पाणी जातच नाही. यात मुख्य वितरिका, उपवितिरिका देखील नादुरूस्त आहेत. - मोहन जाधव, शेतकरी.
हे धरण आमच्यासाठी मृगजळ आहे. ही समस्या म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे. यामुळे रब्बी हंगामात धरणात पाणी असून आम्हाला वंचित रहावे लागणार. - राजेंद्र गोसावी, शेतकरी.
