जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातूनरब्बी हंगामासाठीपाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, कालव्यातून पाणी सुटल्याने शेतकऱ्यांनी अनेक कपाशी उपटून गहू पेरण्याची लगबग सुरू केली आहे. मात्र, डिसेंबरअखेर जात उशिराने पेरला असलेला हा गहू उत्पन्न देणार का अशी चिंता ही शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
यावर्षी परिसरात पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींना अद्यापही बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे यावर्षी कालव्यातून पाणी सुटणार का नाही याबाबतीत शेतकरी संभ्रमात होते.
मात्र मागील आठवड्यापासून या कालव्यातून पाणी सुटल्याने आता शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आता कपाशी उपटून गहू पेरण्यासाठी कंबर कसली आहे.
१७ किमी लांबीचा कालवा
• जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जीवरेखा धरणातून १७किलोमीटर लांबीचा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्याखाली जवळपास ५०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आहे.
• कालव्यातील पाण्याचा लाभ अकोला देवसह गणेशपूर, टेंभुर्णी, पापळ, भातोडी, सावंगी, गोंधनखेडा येथील शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, शाळू ज्वारी आणि हरभरा या पिकांना मोठा लाभ होतो.
कालव्यातून आणखी पाणी सोडण्याची आशा...
• दरम्यान, कालव्यातून अखेरचे पाणी सोडण्याची डेडलाईन २८ फेब्रुवारी असते.
• त्यामुळे यावर्षी पहिले पाणी डिसेंबर महिन्यात सोडल्याने फेब्रुवारीअखेरपर्यंत दोन वेळा पाणी सोडले जाईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
• त्यामुळे गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
