शिराळा : पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यानंतर वारणा नदीचीपाणीपातळी कमी झाल्याने काही शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
तसेच नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार वारणा धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यामुळे नदीपात्र पुन्हा प्रवाही झाले असले, तरी धरणाच्यापाणीसाठ्यात किंचित घट होऊ लागली आहे. सुरुवातीला दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांतून एकूण १००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला होता.
यानंतर बुधवारी सायंकाळी पाचनंतर दोन्ही जनित्रातून १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या मांगले, सावर्डे येथील शेतकऱ्यांना पाण्याची मागणी होती त्यानंतर सध्या पाणी सोडण्यात आले.
धरणात ३३.८८ टीएमसी पाणी
या विसर्गामुळे धरणाच्या पाणीपातळीत घट झाली असून, सध्या धरणात ३३.८८ टीएमसी म्हणजे ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या संपूर्ण पावसाळ्यात धरणात ५६.३६ टीएमसी पाण्याची आवक झाली होती.
वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने घटली होती. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची आणि काही ग्रामपंचायतींची मागणी आल्याने, वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. - बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता, वारणा धरण व्यवस्थापन
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
