कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असून, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून, दिवसभरात तब्बल ४ फुटांनी वाढली असून, पाणी पात्राबाहेर पसरले आहे.
जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. आगामी तीन दिवसांत जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले आहे. शनिवारी दिवसभरही जिल्ह्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीत प्रतिसेकंद ७२१२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून, दिवसभरात तीन फुटांनी वाढ झाली आहे. त्याशिवाय वारणा, दूधगंगा धरणांतूनही विसर्ग वाढल्याने वारणा, दूधगंगा, वेदगंगा या नद्यांचे पाणी झपाट्याने पात्राबाहेर पसरले गेले आहे. गगनबावडा तालुक्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल १००.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत ५६ तर पन्हाळ्यात ४० मिलिमीटर पाऊस झाला.
एस. टी.चे चार मार्ग बंद
पुराचे पाणी रस्त्यांवर आल्याने एस. टी. चे चार मार्ग अंशतः बंद झाले आहेत. यामध्ये पडसाळी, चौकीवाडी, बुरंबाळ, आदी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अलमट्टी ८० टक्के भरले
अलमट्टी धरण ८० टक्के भरले असून यामध्ये प्रतिसेकंद ४९ हजार ८७१ घनफूट पाण्याची आवक आहे; तर ८० हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
१.९८ लाख रुपयांचे नुकसान
दरम्यान, जिल्ह्यात २४ तासांत सात खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोयना धरणात ३.६७टीएमसी पाणी वाढले
२४ तासांत धरणात ३.६७ टीएमसी पाणी आले आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी दरवाजे पाच फूट उचलून विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. वृत्त/आपला विभाग
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी