मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे इरई धरणाच्या जलपातळीत वाढ झाली. त्यामुळे सोमवार (दि. २८) पासून धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपुरातील नदीलगत वस्तीला तडाखा बसू नये, यासाठी चंद्रपूरचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी बुधवारी (दि. ३०) धरणाची पाहणी करून यंत्रणेला खबरदारीच्या सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, धरण व्यवस्थापन अधिकारी राजूरकर, जलसंपदा विभागाचे विजय यादव, नायब तहसीलदार राजू धांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. हवामान विभागाने जिल्ह्याला २४ जुलै रोजी ऑरेंज आणि २५ व २६ जुलै रोजी रेड अलर्ट दिला होता.
चंद्रपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीतही आता वाढ झाली. धरणाची पाणी पातळी ही एस.ओ.पी. नुसार स्थिर ठेवावी. एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा, जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यात. कोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नये, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.
धरणात २०६.३५ मीटर जलपातळी
सध्या इरई धरणाची जलपातळी २०६.३५ मीटर एवढी आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी २०६.०८ मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे धरण व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. २८ जुलैपासून धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार यात वाढ करण्यात येईल किंवा थांबण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी राजूरकर यांनी दिली.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर