यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचेपाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कॅनॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कालव्याची दुरुस्ती करणे अनिवार्य असल्याने पाणी सोडण्यास काहीसा विलंब झाला.
विशेष म्हणजे नाम फाउंडेशनच्या सहकार्याने कालव्यातील गाळ काढून तुटलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनंतर पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. १५ डिसेंबर रोजी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. ८४ किलोमीटरचा टप्पा पार करून २३ डिसेंबर रोजी हे पाणी शेवटच्या भागात ९ क्युमेक्स वेगाने पोहोचले.
गहू, ज्वारी, हरभरा, तूर, हळद, केळी आणि इतर फळबागांसाठी पुढील १५ दिवस सातत्याने पाणी सोडले जाणार आहे, असे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सांगितले. सुरुवातीच्या गावांना न मिळता ते शेवटच्या टोकापर्यंत मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
पाणी वितरणाचे नियोजन योग्य पद्धतीने सुरू आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी सिंचन विभाग प्रयत्नशील आहे. - अ. बा. जगताप, कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प.
