Join us
Daily Top 2Weekly Top 5

नांमका, मन्याड सिंचन प्रकल्पामुळे वैजापूर तालुका प्रगतिपथावर; कॅश क्रॉप घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:58 IST

तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे.

बाबासाहेब धुमाळ 

तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या दारणा धरण समूहातील ऊध्य भागातील धरणांतीलपाणी नांदूर मधमेश्वर धरणात आणून ठेवून जलदगती कालव्याच्या माध्यमातून कोपरगाव (जि. अहिल्यानगर), वैजापूर व गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) या तीन तालुक्यांना पुरवले जात आहे.

यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र वैजापूर तालुक्यात असल्याने तालुक्याचा गोदावरी नदीच्या प्रदेशात असलेला गंगथडी भाग आणली समृद्ध झाला आहे. मागील २० वर्षांत या भागातील शेतजमिनीचा विकास होऊन केवळ खरीप व रब्बी हंगामातील पिकच नव्हे, तर कपाशी व ऊस यांसारखी कॅश क्रॉप घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

परिणामी, या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन शेतकयांचे जीवनमानाही उंचावले आहे. वैजापूर तालुक्यातील ऊस अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यात पाठवला जातो. मात्र आता नजीकच्या भविष्यात वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही गैरसोयही दूर होणार आहे: कारण वैजापूर-गंगापूर रस्त्यावर महालगावजवळ खासगी तत्वावर साखर कारखाना सुरु होणार असून, यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.

त्यामुळे नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यासारखे सिंचन प्रकल्प तालुक्याच्या प्रगतीसाठी पूरक ठरत असल्याचे चित्र दृष्टिपथात आहे. १९ जुलै १९७९ रोजी नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत केवळ ४८ कोटी ७० लाख रुपये होती. यात कालवा भागासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

मात्र तब्बल २० वर्षे कालव्याचे काम रखाडल्यानंतर १९९९ मध्ये प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. १९९९ मध्ये शासनाने या प्रकल्पाला ५७८ कोटी ३६ लाख रुपये खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली व प्रकल्पासाठी मोठ्‌या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर केवळ चार वर्षांतच जलदगती कालव्याचे काम झपाट्‌याने पूर्ण झाले व २००३ मध्ये पहिल्यांदा नांदूर मधमेश्वर धरणातून जलदगती कालव्यात पाणी सोडण्यात आले.

हा दिवस वैजापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरला कारण या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली व याकी या चार धरणांतील पाणी सिंचनासाठी तालुक्याला मिळणार होते. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील १ हजार ५६२ हेक्टर, वैजापूर तालुक्यातील २५ हजार ८९४ हेक्टर व गंगापुर तालुक्यातील १६ हजार ४०४ हेक्टर शेतजमीन भिजत आहे.

सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पीकपद्धतीतही बदल केला आहे. पाटबंधारे विभागाच्या नियोजनानुसार, एका वर्षात नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून रथ्वी व खरीप हंगामासाठी ३ व उन्हाळी हंगामासाठी अशी ४ आवर्तने सोडण्यात येतात.

यामुळे तिन्ही तालुक्यांना जवळपास साडेचार टीएमसी पाणी मिळण्याची सोय झाली आहे. उन्हाळ्यातील आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचीही सोय होत असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तलावही कालव्याच्या पाण्याने भरुन दिले जातात. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

मुख्य कालव्याला २६ वितरिका

नांदूर मधमेश्वर मुख्य कालव्यावर १ ते २६ वितरिका असून, दोन शाखा कालव्यांवर (तालुका गंगापूर) देखील वितरिका आहेत. वैजापूर तालुक्यातील घोगरगाव, गाढे पिंपळगाव, माळीघोगरगाव, जातेगाव, कऊटगाव, वीरगाव, हनुमंतगाव, सिरसगाव, सटाणा, कापूसवाडगाव, भऊर, सुराळा, आदी ४१ गावांतील लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा फायदा होतो.

या गावातील पाझर तलाव, गावतलाव, कोल्हापुरी बंधारे, लघुतलाव उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याने भरुन दिले जातात. गंगापूर तालुक्यातील २० व कोपरगाव तालुक्यातील ७ गावांना कालव्याचे पाणी मिळते. सिंचनासोबतच वैजापूर तालुक्यातून जाणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, जुना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ता व प्रमुख जिल्हा महामार्गाचे जाळे यांमुळे पायाभूत सुविधांमध्येही तालुका आघाडीवर आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही तालुक्याने प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व डी फार्मसी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षणसंस्था शहरात सुरु आल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. वैजापूर तालुक्यातील पारळा येथील मन्याड साठवण तलाव हा सिंचन प्रकल्प तालुक्याच्या डोंगरथडी भागातील जनतेसाठी उपयुक्त ठरला आहे. हा एक नैसर्गिक तलाव आहे.

या तलावात बारमाही पाणी असते. तलावातील पाण्यातून जवळपास २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, पाराळा गावासह भादली, चिकटगाव, खरज, लोणी व तित्तरखेडा या गावांना सिंचनासाठी फायदा होतो. वैजापूर शहराजवळ असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पामुळे शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली असून, लाभक्षेत्रातील अनेक गावांना सिंचनासाठी या तलावाचा फायदा होतो. पावसाळ्यात धरणातील पाणी पाहण्यासाठी नागरिक येथे गर्दी करतात.

हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Vaijapur Thrives: Manyaad Irrigation Project Boosts Cash Crop Farming

Web Summary : Vaijapur's economy has transformed in 20 years due to irrigation projects like the Nandoor Madhyameshwar canal and Manyaad lake. Farmers are increasingly growing cash crops like cotton and sugarcane, leading to improved living standards and a new sugar factory.
टॅग्स :पाणीधरणगोदावरीनांदूरमधमेश्वरछत्रपती संभाजीनगरअहिल्यानगरनाशिकशेती क्षेत्रशेतकरीशेती