Join us

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:09 IST

Radhanagari Water Update : गेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे शनिवारी उघडले असून धरणातून भोगावती नदीपात्रात एकूण ५७८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे शनिवारी उघडले. शनिवारी मध्यरात्री २ वाजून १६ मिनिटांनी दरवाजा क्र. ३ उघडला, तर पहाटे ४ वा. १७ मि. दरवाजा क्र. ६ उघडला.

सायंकाळी १० वाजता दरवाजा क्र. ५ अशा एकूण तीन स्वयंचलित दरवाजातून १४८४ क्यूसेक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १५०० असा एकूण ५७८४ क्यूसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाल्याने नदीच्यापाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली.

जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून शनिवारी दिवसभर रिपरिप राहिली. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने विसर्ग वाढला असून राधानगरी धरण क्षेत्रात दिवसभरात तब्बल ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः भोगावती नदीच्या परिसरात असलेल्या गावांना सतत वाढणाऱ्या पाणीपातळीमुळे संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदत कार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचण्याचे प्रकारही आढळून आले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा : उच्च शिक्षित दोन भावंडांनी केळीतून कमावले २८ लाख; बारूळच्या केळीचा परराज्यात गोडवा

टॅग्स :कोल्हापूरकोल्हापूर पूरहवामान अंदाजपाणीधरणनदीराधानगरी