सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाले असून, कोयना धरणही भरले आहे. त्यामुळे वर्षभराचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे.
तर आता सांगली जिल्हा पाटबंधारे मंडळाने सिंचनाची मागणी केली आहे. या मागणीनुसार सोमवारी सकाळपासून कोयनेतून १ हजार ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते.
तसेच सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते.
यावर्षी जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, मोठे तसेच मध्यम प्रकल्पही भरून वाहिले. मागील सप्टेंबर महिन्यातच कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.
आता धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होणार आहे तर उन्हाळ्याच्या काळात अधिक मागणी राहते. त्यामुळे मागणीनुसार पाणी सोडावे लागते.
सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे पायथा वीज गृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे.
या विसर्गान कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तर भविष्यात आणखी मागणी झाल्यास कोयना धरणातून जादा पाणी सोडले जाणार आहे.
कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून...◼️ कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन पाणी योजना अवलंबून आहेत.◼️ यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते.◼️ तसेच सांगलीमधीलच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही कोयना धरणावरच अवलंबून आहेत.◼️ यामुळे कोयना धरण दरवर्षी भरले की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असते.
अधिक वाचा: तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर