सततच्या पावसामुळे पश्चिम विदर्भातील २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्पापैकी १७ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांतून तिसऱ्यांदा विसर्ग केला जात आहे. यात अकोला जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. यावर्षी सिंचन प्रकल्प तुडुंब भरल्याने रब्बी व उन्हाळी पिकांसाठी सिंचनाची सोय झाली आहे.
पश्चिम विदर्भातीलअकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात २८९ लघु, मध्यम व मोठे प्रकल्प आहेत. यात उर्ध्व वर्धा, पूस, अरुणावती, बेंबळा, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठ्या पाच प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.
शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, पंढरी, गर्गा, बोर्डी नाला, अधरपूस सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, निगुर्णा, मोर्णा, उमा, घुंगशी बॅरेज, अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी असे २७ मध्यम प्रकल्प आहेत.
यातील अकोला जिल्ह्यातील मोर्णा व उमा वाशिम जिल्ह्यातील अडाण व सोनल बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग, मस व उतावळी चार या मध्यम प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार रोजी ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात ९९.३५ टक्के जलसाठा उपलब्ध असून, २७ मध्यम सिंचन प्रकल्पात ८९.०३ टक्के जलसाठा आहे.
तिसऱ्यांदा सोडले पाणी
• १ नोव्हेंबरच्या अहवालानुसार पाचही जिल्ह्यांतील २५३ लघु प्रकल्पात ९३.०६ टक्के जलसाठा आहे. एकूणच अलीकडच्या काही वर्षात पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी नदीपात्रात सोडावे लागत आहे.
• दरम्यान, यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळेलच. उन्हाळी पिकांनादेखील पाणी सोडले जाणार का, हे भविष्यातील पाणी नियोजनावर अवलंबून राहणार आहे.
• उपलब्ध साठा शेतकऱ्यांची मागणी पाहून नियोजन केले जाणार आहे.
