Join us

नीरा खोऱ्यातील 'ही' दोन मोठी धरणे भरली; शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:49 IST

आनंदाची बातमी जोरदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील वीर धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले असून, भाटघर धरणातही ८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

आनंदाची बातमी जोरदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील वीर धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले असून, भाटघर धरणातही ८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची अनेक दिवसांपासूनची चिंता मिटली आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी सातत्याने वाढत होती. बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, वीर धरण ९०.४५ टक्के भरले आहे, तर भाटघर धरणातील पाणीसाठा ८४.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचल्याने, वीर धरणातून नीरा नदीमध्ये १,४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या नियोजनबद्ध विसर्गामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे.

या मुबलक पाणीसाठ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न सुटला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, अशी अपेक्षा आहे.

निरा उजवा कालव्यात पाणी सोडले◼️ निरा खोऱ्यातील भाटघर धरणात सध्या १९.६८ टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे. या धरणातील पाणीसाठा ८४.३३ टक्क्यांवर पोहचला आहे.◼️ निरा देवघर धरणात ७.३६ टीएमसी पाणीसाठा असून, ते ६५.३३ टक्क्यांवर गेले आहे.◼️ वीर धरणात ८.४७ टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण सध्या ९०.३० टक्क्यांवर जाऊन पोहचले आहे.◼️ वीर धरणातून निरा डावा कालव्यात ६०० क्युसेकने सोडले जात आहे, तर निरा उजवा कालव्यात १ हजार २०४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

गुंजवणी धरणात गतवर्षापेक्षा ४५ टक्के अधिक पाणी◼️ गुंजवणी धरणात सध्या २.५१ टीएमसी पाणीसाठा असून, ६८.११ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.◼️ चारही धरणांत मिळून ३८.३३ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून, एकूण पाणीसाठा ७९.३२ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.◼️ गतवर्षी याच तारखेला या चारही धरणांत मिळून १७.०२२ टीएमसी पाणीसाठी होता. त्याची टक्केवारी ३५.२२ इतकी होती.

अधिक वाचा: शेत रस्त्यांचे वाद मिटणार; आता रस्त्यांची कायदेशीररीत्या सातबाऱ्यावर 'या' ठिकाणी होणार नोंद

टॅग्स :धरणपाणीशेतकरीशेतीनदीपाऊसपंढरपूरसोलापूर