नवी दिल्ली: उत्तर भारतात दमदार, इतरत्र बहुतांश भागांत मुसळधार बरसून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे.
पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून पाऊस परतला असून, दोन-तीन दिवसांत पंजाब व गुजरातच्या काही भागांतून परतण्यास स्थिती अनुकूल आहे. राजस्थानमधून नियोजित १७ सप्टेंबरपूर्वी १४ तारखेपासूनच परतीचा प्रवास सुरू झाला.
हवामान विभागानुसार मान्सून साधारण १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो, १७ सप्टेंबरपासून पावसाचा भारतातून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा १४ सप्टेंबरपासूनच पाऊस परतू लागला आहे.
यंदा ७ टक्के अधिक पाऊस
मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून देशभरात ७७८.६ मिमी सरासरीच्या तुलनेत ८३६.२ मिमी, म्हणजे ७ टक्के अधिक पाऊस झाला. हवामान विभागाने अंदाज वर्तविताना यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता
हवामानाचा असा आहे अंदाज
राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी पश्चिमी वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पाऊस सुरू राहील. वातावरणात बदल होत असून, तापमानातही थोडी वाढ झालेली दिसून येईल.
मान्सूनच्या परतीचे हे आहेत निकष
◼️ पश्चिम राजस्थानात समुद्रसपाटीच्या साधारण १.५ किमी उंचीवर उलट दिशेने चक्री वाऱ्यांची स्थिती.
◼️ सलग पाच दिवस एखाद्या क्षेत्रात शून्य मिमी पावसाची नोंद.
◼️ विविध क्षेत्रांत हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे.
अधिक वाचा: परभणी कृषी विद्यापीठ विकसित रबी बियाणे विक्री १७ सप्टेंबरपासून; कोणत्या बियाण्याला किती दर?