मुंबई : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे मुंबईसहमहाराष्ट्र गार पडला असून, नाताळपर्यंत हुडहुडी कायम असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान १४.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.
डिसेंबर महिन्यातील आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान असल्याची नोंद झाली आहे. तर, राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान जेऊर येथे ५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
डिसेंबरच्या आठवड्यात मुंबईत दमट हवामान होते. कालांतराने उत्तरेकडील शीत लहरींमुळे गार वारे दक्षिणेकडे वाहू लागले.
बुधवारपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा किमान पारा १० अंशांपर्यंत घसरला.
गुरुवारी पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली असतानाच शुक्रवारीही किमान तापमानाने ट्रेंड कायम ठेवला आणि महाराष्ट्राला भरलेली हुडहुडी कायम राहिली.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील किमान तापमान
जेऊर - ५
गोंदिया - ८.४
धाराशीव - १०.४
जळगाव - ६.९
यवतमाळ - ८.५
अमरावती - १०.५
अहिल्यानगर - ७.३
सातारा - ९.४
छ. संभाजीनगर - १०.६
नाशिक - ७.८
वाशिम - ९.६
अकोला - १०.७
मालेगाव - ८.४
नागपुर - १०
परभणी - १०.८
मुंबईत पुढचे तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवेल. सोमवारी, मंगळवारी किमान तापमानात किंचित वाढ होईल. पुन्हा गुरुवारपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. आठवडाभर किमान तापमानाचा ट्रेंड कायम राहिल आणि नाताळपर्यंत भरलेली हुडहुडी कायम राहिल. - अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
१२ डिसेंबर रोजी सांताक्रूझ वेधशाळेत १४.९ तर कुलाबा वेधशाळेत २०.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यात शुक्रवारी नोंदविण्यात आलेले १४.९ हे आतापर्यंतचे पहिले नीचांकी किमान तापमान आहे. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
