कोल्हापूर : फेब्रुवारीपासूनच सुरू झालेला उन्हाळा, वाढता उष्मा यांमुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे तुलनेत 'वारणा' वगळता सर्वच जलशयांतील साठा कमी झाला आहे.
साधारणतः प्रत्येक वर्षी जूनपर्यंत पाणी कसे पुरेल, याचे नियोजन पाटबंधारे विभाग करीत असतो. मात्र, यंदा मान्सून अनिश्चित असल्याने ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
गेल्या पावसाळ्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने नोव्हेंबरअखेर पाण्याची फारशी गरज भासली नाही. मात्र, यंदा जानेवारीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली होती.
फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल, मे महिन्यांतील उष्याचा अनुभव कोल्हापूरकरांना आला. जसा उष्मा वाढू लागला तशी पिकांची तहान वाढत गेली.
तुलनात्मक धरणातीलपाणीसाठा, टीएमसी
| धरण | मे २०२५ | मे २०२६ |
|---|---|---|
| राधानगरी | ३.४१ | ३.०६ |
| तुळशी | १.७६ | १.६४ |
| वारणा | ८.७५ | १०.१६ |
| दूधगंगा | ४.३१ | ४.०७ |
| कासारी | ०.८९ | ०.८८ |
| कडवी | १.१३ | १.०५ |
| कुंभी | १.२३ | १.३० |
| पाटगाव | १.४६ | १.४२ |
उपसाबंदी सुरू...
◼️ पाटबंधारे विभाग १० जूनपर्यंत सिंचनाचे, तर ३० जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतो. मात्र, यंदा ३० जूनपर्यंत शेतीसाठी पाणी द्यावे लागेल, अशी स्थिती आहे.
◼️ त्यामुळे आतापासूनच उपसाबंदी करून पाण्याची बचत करावी लागणार आहे. त्यानुसार उपसाबंदीचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.
चार-पाच दिवसांतच कोमेजतात पिके
◼️ साधारणतः चांगल्या प्रतीच्या जमिनीमध्ये उसाला पंधरा ते वीस दिवसांनी पाण्याचा फेर आला, तरी चालत होता.
◼️ मात्र, आता उष्मा जास्त वाढल्याने पाणी दिल्यानंतर चार-पाच दिवसांतच पिके कोमेजू लागतात.
◼️ विजेचा मर्यादित पुरवठा आणि पिकांची पाण्याची मागणी यांचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची दमछाक उडाली आहे.
यंदा पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील साठा कमी दिसत आहे. त्यात दूधगंगा धरणात गळतीमुळे पाणी कमी साठवले होते. तरीही, शिल्लक साठ्याचे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नियोजन केलेले आहे. - स्मिता माने, (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर)
अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे
