नांदेड-यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे सुमारे ३२ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. २ महिन्यात या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
मठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या दुर्गम तालुक्यांसाठी पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड प्रकल्प उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. अखेर वर्षभरापूर्वी सहस्त्रकुंड धबधबा या प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि प्रस्ताव तयार करण्यात आला.
दोन जिल्ह्यांना लाभ
नांदेड जिल्ह्यातील २० हजार एकर तर यवतमाळ जिल्ह्यातील १२ हजार एकर असे एकूण ३२ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक आमदारांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता, मंत्री विखे पाटील यांनी दोन महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळणार असल्याचे शुक्रवारी सांगितले.
२० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प
नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड प्रकल्पामुळे सुमारे ३२ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ९ टीएमसी क्षमतेचा हा प्रकल्प आहे. सोबतच २० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प यावर विकसित होणार आहे. या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव महामंडळाने मंजूर करून नाशिक येथील तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवला आहे. लवकरच या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळेल आणि प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू होतील. - संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ.
७ हजार कोटी रुपये अंदाजे खर्च
• सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरेड आणि महागाव तालुक्यातील ३२ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे या भागातील पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.
• नाशिक येथील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार कार्यालयाकडून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव जाईल. तेथून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.