सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीला पंधरा दिवसांत तीन वेळा महापूर आल्याने नदीकाठावरील शेतांतील उभ्या पिकांत पाणीचपाणी साठलेले आहे. खरिपाचे नुकसान झालेच आहे; यासह यंदा रब्बी पेरण्याही आणखी महिनाभर लांबणीवर गेल्याचे शक्यता आहे.
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील खडकी, आळजापूर बिटरगाव निरज बोरगाव व तरटगाव येथील शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली आहेत. तरटगाव व बिटरगाव (श्री) येथील जमिनी खरडून गेलेल्या आहेत. नदीला आलेल्या महापुरात खडकी तरडगाव येथील बंधारा वाहून गेल्याने सर्वाधिक नुकसान खडकी येथे झाले.
खडकी येथील कुलदीप रामभाऊ शिंदे यांची दोन एकर मका पीक आठ ते दहा दिवसांत काढणीस आले होते. पण, पुराच्या पाण्यात बुडाले असून आता कुजले आहे. खड़की गावातील शंभर एकर ऊस जमिनीवर लोळला असून, अद्याप शेतात पाणी असल्याने तो पूर्णपणे मुळापासून उद्ध्वस्त झालेला आहे.
खरातवस्ती येथील ३० घरे पाण्याखाली गेल्याने पुराच्या पाण्यात संसारोपयोगी साहित्य, धान्यांचे नुकसान झाले. बापू बबन खरात यांच्या अडीच एकर लिंबोणीच्या बागेत पुराचे पाणी शिरल्याने पाण्याच्या प्रवाहाने ३५० झाडे उखडून पडली. केम येथील दत्तात्रय तळेकर यांच्या व पाथुर्डी येथील गोरख मोटे यांच्या पिकाचे नुकसान झाले.
५० हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्याची मागणी
सीना नदीला तीनदा आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे भरून न येणारे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी. - संतोष वारे, तालुकाध्यक्ष, शरद पवार गट, करमाळा.
हेही वाचा : गाईच्या शेण-गोमूत्रातून ७ उत्पादने; गाईपासून समृद्धी मिळवणाऱ्या सुनंदाताईंची कहाणी