मुंबई : उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली.
सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. हे तापमान सरासरीच्या १४ अंश सेल्सिअसने खाली आहे. तर मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, उन्हाचा तडाखा तुलनेने कमी झाला आहे.
रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा आल्याने मुंबईला किंचित का होईना दिलासा मिळाला. जळगावला पुन्हा रविवारपेक्षा तापमानात घसरण होऊन ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले.
ते सरासरीच्या ६.४ अंशांनी खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. जळगावचे कमाल तापमानही २९.८ अंश नोंदवले गेले. ते सरासरीच्या ३.७ अंशने कमी झाले आहे.
हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अहिल्यानगर, छ. संभाजी नगर, बीड, डहाणू, नाशिक, नंदुरबार, नांदेड, सांगली या शहरांबरोबरच विदर्भातील शहरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
तीन दिवसांत पारा घसरेल
बुधवारपर्यंतच्या तीन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, डहाणू व छ. संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारचे किमान तापमान
जेऊर - ९
जळगाव - ९.५
नाशिक - १०.८
अहिल्यानगर - ११.३
बीड - ११.५
छ. संभाजी नगर - ११.८
नंदुरबार - १२.३
नांदेड - १२.८
सातारा - १३.६
मालेगाव - १३.८
परभणी - १४
सांगली - १४.४
धाराशीव - १४.६
सोलापूर - १५.४
मुंबई - १९
अधिक वाचा: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा आता तुमच्या मोबाईलवर
