Join us

विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार; पुढील ५ दिवसांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 08:57 IST

Maharashtra Weather Update विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय, संमिश्र हजेरी विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय, संमिश्र हजेरी विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मंगळवारी रत्नागिरी, मुंबई, पुणे सह सांगली मध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

बुधवारी (दि. १६) विदर्भातील बहुतांश भागात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, या भागाला 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.

तर पुणे व परिसरात पुढील चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जुलैपासून पावसाने राज्यातील बहुतांश भागात उघडीप घेतली आहे. अरबी समुद्रातून निर्माण होणारे मान्सूनचे वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस काहीसा विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

राज्यात २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्केच पाऊस◼️ कृषी विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार बीडमधील थारूर तालुक्यात अजूनही २५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, तर २५ ते ५० टक्के पावसाची नोंद एकूण २८ तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे.◼️ त्यात नंदुरबारमधील तळोदा, जळगावमधील रावेर, अहिल्यानगरमधील श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी तर सोलापूरमधील करमाळा, पंढरपूर, जालन्यामधील परतूर, घनसावंगी, बीडमधील बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, परळी या तालुक्यांचा समावेश आहे.◼️ लातूर जिल्ह्यातील लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, धाराशिवमधील धाराशिव, भूम तर परभणीत परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ, मानवत व विदर्भातील गडचिरोलीत सिरोंचाचा समावेश आहे, तसेच ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा: पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर; कोणत्या धरणात किती पाणी?

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भसांगलीमुंबईपुणेपेरणीपीक