गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. विसर्गात घट झाल्यामुळे भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उघडे करण्यात आले आहेत. पीक नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे.
पुराच्या पाण्यामुळे मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर, कौठाळी, जुना पालखी मार्ग, नांदुरे-नेवरे पुलावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. भीमा व नीरा खोऱ्यातील सर्व साखळी धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणांमधून उजनी, वीर धरणात पाण्याचा मोठा विसर्ग येत होता.
धरणातील पाणी पातळी समतोल राखण्यासाठी उजनी धरणातून १ लाख ७५ हजार व वीर धरणातून ६० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा व नीरा नदीत सोडण्यात येत होता. या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला होता. या पुराचा फटका सर्वाधिक पंढरपूर तालुक्याला बसला असून तालुक्यातील हजारो एकर ऊस, फळबागांचे क्षेत्र पाण्याखाली गेले होते. गोपाळपूर, कौठाळी, नांदुरे नेवरे पूल, पंढरपूर-तिन्हे मार्गे सोलापूर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ येथील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरल्याने ७०० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांसह प्रशासन चिंतेत होते. मात्र शुक्रवारी दुपारनंतर घाटमाथ्यावरील पाऊस थांबताच धरणातील आवक कमी झाली.
त्यानंतर धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्गही हळूहळू कमी करण्यात येत असून शनिवारी सायंकाळी फक्त ४५ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होता. तरीही पंढरपूर येथे भीमा नदीत ७८ हजार क्युसेकने वाहत होती.
आमदारांची पूरग्रस्त भागाला भेट
महापुराचे पाणी हळूहळू ओसरू लागल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघातील नदीकाठच्या गावांना भेट देऊन पाहणी केली. तसेच आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
धरणातून येणारा विसर्ग कमी केल्यानंतर पूर ओसरू लागला आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी झाले आहे तेथे पंचनामे सुरू केले आहेत. गोपाळपूर, कौठाळी, जुन्या पालखी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नदीवरील बंधारे उघडण्यात आले आहेत. - सचिन लंगुटे, तहसीलदार, पंढरपूर.