मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला शनिवारी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, मुंबईत शनिवारीही शुक्रवारप्रमाणेच पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पालघर व पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरच्या परिसराला 'रेड अलर्ट' देण्यात आला असून, या परिसरात अधिक पावसाची शक्यता आहे. शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारपासून पावसाचा जोर अधिक आहे.
सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसाची दररोजची सरासरी नोंद ६० मिमीपेक्षा जास्त असून, शहराच्या तुलनेत उपनगरात पावसाची नोंद अधिक झाली आहे. दरम्यान, रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
२६ जुलैपर्यंत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक वाचा: Ranbhajya : बाजारात आलेल्या 'या' आरोग्यवर्धक रानभाज्यांवर यंदा नक्की मारा ताव