यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी आवर्तनाचे नियोजन केले असून चार आवर्तनातून पाणी सोडण्यात येणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी चार पाणी आवर्तन मिळणार असल्याने कालवा लाभ क्षेत्रातील सेलू, मानवत, परभणी व जिंतूर तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांना सिंचनाची सोय होणार आहे.
निम्न दुधना प्रकल्पात जून महिन्यापासूनच पाऊस पडल्यानंतर पाण्याची आवक सुरू झाली होती. मे महिन्यात प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा होता; परंतु पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती.
यातच सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. सद्य:स्थितीत प्रकल्पात मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांना पाणी देण्यासाठी प्रकल्पातून दोन्ही कालव्यात चार आवर्तनातून पाणी देण्यात येणार आहे
डावा ४८, तर उजवा ६९ किमीचा कालवा
• निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ किलोमीटरचा असून १२ हजार ८२८हेक्टर जमीनला सिंचनाची सोय होते, तर डावा कालवा ६२ किमी अंतराचा आहे.
• यावर १५ हजार ८७० एवढ्या क्षेत्रावर पाणी मिळू शकते; परंतु अनेक भागांत वितरिकांचे अपूर्ण काम असल्यामुळे टेलपर्यंत पाणी व्यवस्थित वितरित होत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
अपूर्ण वितरिकांचा अडथळा ९० टक्के पेरणी पूर्ण, सिंचनावर भर
• तालुक्यात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र ३१ हजार ७२२ एवढे आहे.
• यात हरभरा १६ हजार ४९३ हेक्टर, गहू ३ हजार ९८५, ज्वारी ७९३६ हेक्टरवर घेण्यात आली आहे.
• दरम्यान, सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील २० टक्के पिकांची पेरणी झाली आहे.
• अद्यापही हरभरा, गहू आणि ज्वारी पिकांची पेरणी चालू आहे.
असे राहणार आवर्तन
पहिले आवर्तन २ ते १५ डिसेंबरपर्यंत आहे. दूसरे ३० डिसेंबर ते १२ जानेवारी, तिसरे २७जानेवारी ते ९ फेब्रुवारी, तर चौथे आवर्तन २१ फेब्रुवारी ते ९ मार्चदरम्यान सोडले जाणार आहे. त्यामुळे कालवा लाभ क्षेत्रातील जवळपास हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी मिळणार आहे.
अपूर्ण वितरिकांचा अडथळा
निन्म दुधना प्रकल्पातून २ डिसेंबरपासून पहिले आवर्तन सोडण्यात आले. दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रात तालुक्यातील ३४ हजार हेक्टर जमिनीला पूर्ण क्षमतेने सिंचन होऊ शकते. परंतु, अनेक भागांत वितरिका आणि लघु वितरिकांची कामे अपूर्ण असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सिंचन होण्यास अडथळा येत असून दुरुस्तीची मागणी होत आहे.
