Join us

पंचगंगा नदीची पातळी ३९ फुटांपर्यंत खाली तर हिप्परगीतून विसर्ग वाढवला; कोल्हापूरकरांना आजही ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 11:43 IST

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे.

तसेच अद्याप ४१ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत आहे. पण, कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावरील व कोल्हापूर ते शिये मार्गावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर पूर्णपणे उघडीप राहिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे.

परिणामी, विसर्गही कमी झाला असून, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १५००, वारणा १६३० तर दूधगंगेतून ६१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामणी प्रकल्पातूनही ३७२४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी ३९ फुटांपर्यंत आली आहे.

एवढे मार्ग बंद

राज्य मार्ग - ०६

प्रमुख जिल्हा मार्ग - २१

जिल्हा मार्ग - ११

ग्रामीण मार्ग - ३०

स्थलांतरित कुटुंबे

कुटुंबे - २३९

नागरिक - ९३१

जनावरे - ३८

हिप्परगीतून विसर्ग वाढवला

• कोल्हापुरातील नद्यांचा पूर नियंत्रणात राहण्यासाठी अलमट्टीबरोबर हिप्परगी धरणातील विसर्ग महत्त्वाचा असतो. त्यामुळे या दोन्ही धरणांतील विसर्गाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष अधिक असते.

• शनिवारी अलमट्टी धरणात प्रतिसेकंद २ लाख ४५ हजार घनफूट पाण्याची आवक होत असून, विसर्ग २ लाख ५० हजार घनफूट ठेवला आहे. तर, हिप्परगीमध्ये २ लाख ६४ हजार घनफूट पाण्याची आवक होऊन २ लाख ६३ हजाराचा विसर्ग ठेवला आहे.

कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने सोमवार (दि. २५) पर्यंत कोल्हापूरसह राज्यात पावसाची उघडझाप राहील, असे सांगितले असले तरी आज रविवारसाठी 'ऑरेंज' अलर्ट दिला आहे. विशेषतः घाट माथ्यावर पाऊस राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा मुलाने उभारला कोट्यवधींचा उद्योग; प्रसंगी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलेल्या तरुणाची वाचा यशोगाथा

टॅग्स :कोल्हापूरकोल्हापूर पूरपाऊसपाणीनदीधरणशेती क्षेत्र