Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा सहन करणारा उत्तर महाराष्ट्र होणार जलमय; नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:31 IST

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

नेक दशकांपासून पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' ठरणार आहे.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गिरणा खोरे प्रकल्प विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला हे काम देण्यात आले आहे.

नार-पार-गिरणा प्रकल्पाची मूळ संकल्पना म्हणजे कोकण पट्टयातील आणि पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून ते दुष्काळी गिरणा नदी खोऱ्यात आणणे.

सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यांमधील पाणी विविध धरणे, पंपिंग स्टेशन, बोगदे आणि पाइपलाइनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचवले जाणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या नऊ ठिकाणी धरणांची उभारणी केली जाणार आहे.

याशिवाय माणखेड आणि सालभोये येथे मोठे जलसाठे उभारण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचे जाळे तयार होणार आहे.

गिरणा खोऱ्याकडे पाणी वळवण्यासाठी विशेष बोगदेही उभारले जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो.

विशेषतः नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळणार असून कृषी उत्पादनवाढीस चालना मिळेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.

हवामान बदल, घटते भूजल आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचन प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

English
हिंदी सारांश
Web Title : North Maharashtra's Drought to End: River Linking Project Approved

Web Summary : The Nar-Par-Girna river linking project, costing ₹4116 crore, aims to bring water to drought-prone North Maharashtra. Water will be diverted from Konkan to the Girna basin, benefiting Nashik, Jalgaon, and Dhule with irrigation and drinking water. This project promises agricultural growth and water security.
टॅग्स :पाणीनदीधरणसमुद्रशेती क्षेत्रजळगावनाशिक