अविनाश मुडेगावकर
शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरालगतच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. बालासाहेब चोपणे नामक शेतकऱ्याने आपल्या अवघ्या ४ गुंठे जमिनीत लावलेल्या पुदिना पिकातून गेल्या ५ वर्षात ५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून 'बाप-लेक लखपती' होण्याचा मान मिळविला आहे
बालासाहेब चोपणे यांची एकूण २० गुंठे जमीन असून त्यात त्यांनी पेरू, आंबा आणि विविध फुलांची झाडे लावली आहेत. २०२० मध्ये त्यांनी कोविड काळात ४ गुंठ्यांत पुदिन्याची लागवड केली. विशेष म्हणजे, या पिकासाठी ते कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करत नाहीत.
पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने जोपासल्यामुळे या पुदिन्याला चव आणि सुगंध उत्तम मिळतो. पुदिना हे पीक नाजूक असले तरी त्याला पाण्याची नियमित गरज असते. चोपणे यांनी स्वतःच्या बोअरवेलच्या जोरावर हे पीक टिकवून धरले आहे. व्यापारी किंवा मध्यस्थांना पुदिना न देता, ते स्वता आठवडी बाजारात जाऊन याची विक्री करतात. यातून त्यांना दरमहा साधारण ५ हजार रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळते.
छोट्याशा तुकड्यातून पाच लाखांचा टप्पा ओलांडला
• गेल्या पाच वर्षात या छोट्याशा तुकड्यातून त्यांनी ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
• पुदिन्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती असल्याने आणि त्याचा वापर चहा, बिर्याणी, पाणीपुरी, चटणी, ज्यूस आणि बर्गर अशा विविध खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाजारात बारमाही मागणी असते.
• कमी जमिनीत आणि शून्य खर्चात शाश्वत उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठीही दिशादर्शक ठरत आहे. सेंद्रिय पध्दतीने केलेली ही शेती आदर्श उदाहरण ठरली आहे.
